ठाणे महापालिकेच्या आपत्ती योद्ध्यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

ठाणे महापालिकेच्या आपत्ती योद्ध्यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
ठाणे महापालिकेच्या आपत्ती योद्ध्यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या धाडसी कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. संकटाच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाणाऱ्या या जवानांना सेफ इंडिया ब्रेव्हरी अवॉर्ड २०२६ने सन्मानित करण्यात आले.

मुंबई येथे किंग एक्सपो मीडियाच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानचिन्ह, ट्रॉफी आणि गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

देशभरातून मागविण्यात आलेल्या नामांकन अर्जांमधून उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. या प्रक्रियेत ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल, टीडीआरएफ आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातील जवानांची निवड झाली.

अग्निशमन दलाचे अधिकारी गणेश खेताडे, स्वप्नील सरनोबत तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. तडवी यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.

आग, पूर, इमारत दुर्घटना तसेच विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम हे जवान सातत्याने करत असतात. त्यांच्या या निस्वार्थ आणि धाडसी सेवेचा राष्ट्रीय स्तरावर झालेला सन्मान हा ठाणे शहरासाठी अभिमानाची बाब आहे.

या गौरवाबद्दल महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी सर्व आपत्ती योद्ध्यांचे अभिनंदन केले. या पुरस्कारामुळे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कार्यक्षमतेला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली असून, ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला