आगा खान नेटवर्कच्या विकास उपक्रमांना राज्य शासनाचे सहकार्य

आगा खान नेटवर्कच्या विकास उपक्रमांना राज्य शासनाचे सहकार्य
आगा खान नेटवर्कच्या विकास उपक्रमांना राज्य शासनाचे सहकार्य

मुंबई, दि. १३: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या महाराष्ट्रातील आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना राज्य शासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पाचवे आगा खान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्याच अधिकृत दौऱ्यावर आलेले प्रिन्स रहीम आगा खान यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईतील फेअरमाँट हॉटेल येथे भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

बैठकीत जलसंधारण, हवामान कृती, जलव्यवस्थापन, वारसा संवर्धन, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांवर चर्चा झाली. ग्रामीण भागातील जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी नेटवर्कने केलेल्या कार्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. जलटंचाईग्रस्त भागांतील प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी राज्य शासन भागीदारी करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरी उष्णता कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासाची माहिती शिष्टमंडळाने दिली. हरित क्षेत्रवाढ, पर्यावरणपूरक नियोजन आणि हवामान कृतीसाठीचे उपक्रम शहरांच्या विकासासाठी उपयुक्त ठरतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्य शासन आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क यांच्यात सातत्यपूर्ण संवादासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारण्याबाबतही बैठकीत सहमती व्यक्त करण्यात आली.

प्रस्तावित बालरुग्णालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष जेरियाट्रिक रुग्णालय, पुनर्वसन केंद्र आणि आरोग्य सेवा प्रशिक्षण सुविधांबाबतही चर्चा झाली. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने जेरियाट्रिक तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावाचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. वाढत्या वृद्ध लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेता अशा विशेष आरोग्य सुविधांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

सांस्कृतिक वारसा संवर्धन, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि समुदाय सहभागावर आधारित प्रकल्पांचा विस्तार करण्याची तयारी प्रिन्स रहीम आगा खान यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील विकास उपक्रमांमध्ये सहकार्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.

यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार अमीन पटेल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी आणि सचिव डॉ. राजेश गवांदे आदी उपस्थित होते.