ठाणे महापालिकेतर्फे 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान
ठाणे, 15 ऑगस्ट : ठाणे महानगरपालिकेतर्फे देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. ठाणे महापालिकेचे सुरक्षा दल, अग्निशामक दल आणि टीडीआरएफच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
या सोहळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण, विविध प्रभाग समित्यांचे अध्यक्ष व अध्यक्षा, स्थानिक नगरसेवक, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, गुणवंत कामगारांचे कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान
ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत 10 प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत कामगार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रविण श्रीराम बनोटे, दीपक लक्ष्मण कोंडुळे, लागून कृष्णा नाडार, अशोक धोंडिबा पाटील, दीपाली अशोक खाजेकर, शालूबाई गोविंद धोत्रे, आत्माराम बाबू पाटील, सोनल सुनील पाटील, अनिल तुळशीराम कदम, माधुरी धनावडे आणि सुनिता दुधाम यांचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी उपायुक्त (घनकचरा) मधुकर बोडके आणि आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे उपस्थित होते. बदलत्या ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी सातत्याने मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सन्मान करण्यात आल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी ठाणेकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपुरुषांना अभिवादन
ध्वजारोहण सोहळ्यानंतर महापालिका भवनातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शहरातील विविध ठिकाणी असलेल्या महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
: ठाणे महापालिका मुख्यालय येथे ध्वजारोहण करताना महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे.
: कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण, विविध प्रभाग समित्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह अधिकारी.
गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मधुकर बोडके आणि आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे.