डॉ. दिलीप गरुड यांचा मुंबईत गोंधळी समाजाच्या वतीने सत्कार

डॉ. दिलीप गरुड यांचा मुंबईत गोंधळी समाजाच्या वतीने सत्कार
डॉ. दिलीप गरुड यांचा मुंबईत गोंधळी समाजाच्या वतीने सत्कार

मुंबई : भटके विमुक्त जनजाती विकास परिषद अखिल भारतीय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुंबई दौऱ्यावर आलेले डॉ. दिलीप गरुड यांचा महाराष्ट्र गोंधळी समाजाच्या वतीने कांदिवली पूर्व येथील तुळजाभवानी मंदिरात उत्साहात सत्कार करण्यात आला.

समाजाच्या वतीने डॉ. गरुड यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांचे सहकारी प्रा. शिवाजीराव नवलखिले उपस्थित होते. संघटनेचे पदाधिकारी मारुती साळुंके, हरिबा कोंडे, अशोक वाडेकर, जनक वाडेकर, जनक साळुंके, दत्ता वाडेकर, दिगंबर वाडेकर, ॲड. प्रवीण काळे, सुग्रीव शिंदे, रुक्माजी वाडेकर, नागेंद्र काळे तसेच उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उबाळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत उबाळे यांनी मुंबईतील गोंधळी समाजासमोरील विविध समस्या डॉ. गरुड यांच्या निदर्शनास आणून दिल्या. सत्काराला उत्तर देताना डॉ. गरुड यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णवेळ काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजबांधवांचे कोणतेही प्रश्न किंवा कामे असल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

तरुणांनी पारंपरिक व्यवसायाबरोबरच विविध उद्योग आणि व्यवसायांकडे वळावे, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना मुलांच्या शिक्षणाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे भटक्या विमुक्त समाजातील पहिलीपासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

समाजातील तळागाळातील नागरिकांना आधार देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम करावे, अशी आपली दिवंगत पत्नी सौ. सुप्रिता यांची इच्छा होती, अशी भावना व्यक्त करताना डॉ. गरुड भावुक झाले.

भटके विमुक्त जनजाती विकास परिषदेच्या मुंबई कार्यालयाला भेट

मुंबई दौऱ्यादरम्यान डॉ. दिलीप गरुड यांनी बोरिवली पूर्व येथील फुलपाखरू उद्यान परिसरातील विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद अखिल भारतीय संघटनेच्या केंद्रीय कार्यालयालाही भेट दिली. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांची ही कार्यालयातील पहिलीच भेट होती.

यावेळी राज्य कार्यवाह गिरीधर साळुंके, मुंबईतील पदाधिकारी मंगेश शिंगे, आबा उबाळे, महादेव रसाळ, संदेश रसाळ, राहुल भुसारी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी डॉ. गरुड यांचे शाल आणि तुळशीचे रोप देऊन स्वागत केले.

भटके विमुक्त समाजाच्या संघटनात्मक विस्ताराबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. मुंबईसारख्या महानगरात समाजासाठी स्वतंत्र कार्यालय कार्यरत असल्याचे पाहून डॉ. गरुड यांनी समाधान व्यक्त केले. हे कार्यालय समाजाच्या दृष्टीने कौतुकास्पद उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीकुमार शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून संघटनेच्या कामकाजाबाबत चर्चा केली.

दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल असलेले संघटनेचे मुंबई अध्यक्ष सहदेव रसाळ यांची डॉ. गरुड यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

भटके विमुक्त समाजासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांचे काम पाहून आपण प्रभावित झालो असल्याचे डॉ. गरुड यांनी सांगितले. अशा संघटनेत समाजासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते, राष्ट्रीय कार्यवाह अनिल फड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीकुमार शिंदे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सहदेव रसाळ तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

मराठवाड्यात भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी कार्य करणाऱ्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून संघटनात्मक समन्वय वाढविण्यासाठी लवकरच प्रमुख कार्यकर्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेसाठी संबंधितांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजाच्या विकासासाठी संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार व्यक्त करून डॉ. गरुड यांनी उपस्थितांचा निरोप घेतला आणि पुढील प्रवासासाठी नवी मुंबईकडे प्रस्थान केले.