धारदार शस्त्रे विक्री करणाऱ्या दोन इसमांना अटक करून त्यांच्याकडून ३७ हत्यारे जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी.
कोल्हापूर :– मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित साो, कोल्हापूर यांनी शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हयामध्ये कोंम्बींग ऑपरेशन व ऑपरेशन ऑल आऊट करणेबाबत सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे
अन्वेषण शाखेस आदेशीत केले होते.
मा. पोलीस अधीक्षक साो यांचे आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर व स्टाफ असे आज दिनांक १९/०२/२०२५ रोजी शिवजयंती निमित्त शहर हद्दीमध्ये कोंम्बींग ऑपरेशन करीत असताना गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडीयम जाणारे रोडवर विश्वपंढरी जवळ दोन इसम लाल रंगाची मोपेड गाडी रस्त्याच्या कडेला लावून धारदार हत्यारे विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव, पोलीस अंमलदार कृष्णात पिंगळे, युवराज पाटील, परशुराम गुजरे, अमित सर्जे, वैभव जाधव, राजेश राठोड यांनी सदर ठिकाणी जावून छापा टाकून इसम नामे १) सुनिलसिंग मनोहरसिंग दुधाणे, वय ३२, रा वंदे मातरम कॉलनी, बालाजी टॉकीज जवळ, म्हैसूर कर्नाटक, २) गोविंदसिंग भारतसिंग टाक, वय २९ रा. आसरेनगर, निपाणी, ता चिकोडी, जिल्हा बेळगांव, कर्नाटक यांना पकडून त्यांचे कब्जातून विक्रीकरीता आणलेल्या ०३ तलवारी, ०३ गुप्त्या, ०५ खंजीर, ०२ सत्तूर, ४ कोयते व २० चाकू अशी एकुण ३७ धारदार व प्राणघातक हत्यारे, मोपेड गाडी, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे ९१,६००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केलेला आहे. सदर इसमांचे विरूध्द भारतीय हत्यार कायदा प्रमाणे जुना राजवाडा पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव, पोलीस अंमलदार कृष्णात पिंगळे, युवराज पाटील, परशुराम गुजरे, अमित सर्जे, अरविंद पाटील, वैभव जाधव, राजेश राठोड, नामदेव यादव, महादेव कुराडे अशांनी केलेली आहे.