पर्यावरणाची हानी म्हणजे वंचित समूहांचे मरण : सुजात आंबेडकर
नाशिक : पर्यावरणाची हानी झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका दलित, आदिवासी आणि वंचित समूहांना बसतो. जंगलतोडीमुळे आदिवासींचे विस्थापन होते, तर पर्यावरणाच्या ऱ्हासाचे गंभीर परिणाम शोषित आणि वंचित घटकांना सर्वप्रथम भोगावे लागतात, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली दूषित आणि पिवळे पाणी पुरवणाऱ्या यंत्रणांना जाब विचारा. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरा, असे आवाहनही त्यांनी तरुणांना केले.
नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात गुरुवारी जय भीम जेन झी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुजात आंबेडकर यांनी नाशिकमधील दूषित पाण्याचा प्रश्न, कर्जत परिसरातील वृक्षतोड आणि राज्यात प्रस्तावित डेटा सेंटरच्या पर्यावरणीय परिणामांवर भाष्य केले.
नाशिककरांना दूषित पाणीपुरवठा होत असताना संबंधित यंत्रणांची जबाबदारी कोण निश्चित करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पाणीपुरवठा विभाग आणि पर्यावरण विभागासह संबंधित यंत्रणांनी याबाबत उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक आमदार आणि खासदारांनाही या प्रश्नाची जबाबदारी टाळता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची माहिती व्हिडिओ आणि अहवालांच्या माध्यमातून सादर करण्यात आली. विशेषतः लहान बालकांच्या आरोग्याचा प्रश्न अधोरेखित करण्यात आला. पीडित महिलांनी मंचावर येऊन दूषित पाण्यामुळे जाणवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांचा अनुभव मांडला.
जंगलतोडीला मुख्यमंत्र्यांचे समर्थन का?
भीमाशंकर परिसरातील जंगलात प्रस्तावित प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित करत सुजात आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गुजरातस्थित टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी आदिवासींच्या हिताकडे दुर्लक्ष करून जंगलतोडीला समर्थन का दिले जात आहे, असा सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबाबत उपस्थित केला. जल, जंगल आणि जमीन वाचविण्यासाठी तसेच वंचित समूहांच्या न्याय्य हक्कांसाठी वंचित बहुजन आघाडीचा लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
तरुणांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारावा
नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. तरुणांनी केवळ प्रेक्षक न राहता आपल्या हक्कांसाठी सक्रियपणे आवाज उठवावा, असे आवाहन या कार्यक्रमातून करण्यात आले.
रॅप आणि प्रबोधनगीतांची मेजवानी
कार्यक्रमाच्या प्रारंभी विपीन तातड, श्रावस्ती हिवराळे, रॅपर संकेत, रॅपर लकी आणि मुझफ्फर शेख यांनी रॅप सादर केले. प्रसिद्ध गायक संतोष जोंधळे, राहुल लेहणार आणि खान्देशी गीतांचे गायक भैय्या मोरे यांनी प्रबोधनगीतांचे सादरीकरण केले. या सांगीतिक कार्यक्रमाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुजात आंबेडकरांसोबत रंगला सवाल-जवाब
कार्यक्रमात जेन झीच्या तरुणाईने सुजात आंबेडकर यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत कसे पोहोचवावेत, मुस्लिम तरुणाईला आंबेडकरवादी विचारांशी कसे जोडावे, चळवळीत जुन्या आणि नव्या पिढीची सांगड कशी घालावी, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, वसतिगृहांची स्थिती, आरक्षण, शिष्यवृत्ती आणि यूजीसीच्या निधीबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. नाशिकमधील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यावरील उपाययोजनांबाबतही तरुणांनी प्रश्न उपस्थित केले. सुजात आंबेडकर यांनी या प्रश्नांना संवादात्मक आणि सकारात्मक पद्धतीने उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, शहराध्यक्ष दिनेश जाधव, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मिहिर गजबे, बाळासाहेब शेजवळ, साहिल सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष ऊर्मिला गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.