भगवान बिरसा मुंडांचे आदर्श आत्मसात करा : आमदार विनोद अग्रवाल
गोंदिया : भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी दिलेला लढा आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांचे संघर्षमय जीवन, विचार आणि आदर्श प्रत्येकाने आत्मसात करून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.
धरती आबा अमर वीर हुतात्मा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिनानिमित्त गोंदिया विधानसभा क्षेत्रातील चुटिया, सितुटोला, दासगाव, लहीटोला आणि भागवटोला तसेच हिवरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना आमदार विनोद अग्रवाल यांनी उपस्थित राहून भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले आणि आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना अग्रवाल यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनाचा, अदम्य साहसाचा आणि देशासाठी दिलेल्या बलिदानाचा गौरव केला. भगवान बिरसा मुंडा हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर आदिवासी अस्मिता, स्वाभिमान, हक्क आणि स्वातंत्र्याचे प्रतीक होते. ब्रिटिश राजवटीविरुद्ध आणि शोषणकारी व्यवस्थेविरुद्ध त्यांनी दिलेला लढा भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्याय आहे, असे त्यांनी सांगितले.
आदिवासी समाजाने शतकानुशतके जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी संघर्ष केला आहे. आपली संस्कृती, परंपरा आणि अस्तित्व टिकवण्यासाठी या समाजाने मोठे योगदान दिले आहे. केंद्र सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या योगदानाचा सन्मान करून त्यांची जयंती जनजातीय गौरव दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला, ही संपूर्ण आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
फार्मर आयडीअभावी शेतकरी शासकीय लाभांपासून वंचित
यावेळी आमदार अग्रवाल यांनी वनहक्क कायद्यांतर्गत जमिनीचे हक्क मिळालेल्या शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीचा प्रश्न उपस्थित केला. वनजमिनीवर शेतीचा हक्क मिळूनही अनेक पात्र शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले नव्हते. त्यामुळे त्यांना धानाची शासकीय खरेदी, बोनस आणि इतर कृषी योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत होत्या, असे त्यांनी सांगितले.
या समस्येची दखल घेऊन पात्र शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांप्रमाणे शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान विक्री करता येणार असून बोनस, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची आर्थिक मदत आणि विविध कृषी योजनांचा लाभ घेता येणार आहे, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
पात्र शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ
या निर्णयाचा लाभ केवळ आदिवासी शेतकऱ्यांपुरता मर्यादित नसून, 1 जानेवारी 2015 पूर्वीपासून अतिक्रमित जमिनीवर शेती करून तिचा वापर करणाऱ्या निर्धारित निकषांनुसार पात्र असलेल्या इतर शेतकऱ्यांनाही मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ तांत्रिक किंवा कागदपत्रांच्या अडचणींमुळे पात्र शेतकरी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नयेत, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
आदिवासी समाजाचा विकास केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित न ठेवता त्यांच्या संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि अधिकारांचे संरक्षण करणेही आवश्यक आहे. शिक्षण, शेती आणि सामाजिक जागरूकतेच्या माध्यमातून आदिवासी समाजाने विकासाच्या मुख्य प्रवाहात सक्षमपणे पुढे यावे. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली.
या कार्यक्रमांमध्ये विविध गावांतील ग्रामस्थ आणि आदिवासी समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.