पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपातर्फे अनेक ठिकाणी निदर्शने

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपातर्फे अनेक ठिकाणी निदर्शने

भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवारी ठिकठिकाणी पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने प्रदेश कार्यालयात जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्‍याड हल्‍ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. यावेळी अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘आतंकवाद मुर्दाबाद’ चे फलक हातात घेऊन हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकारच्या समर्थनार्थ ‘अमितभाई आगे बढो हम तुम्हारे साथ है’ या आशयाचे फलक हातात घेण्यात आले होते. यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष वासिम खान, उपाध्यक्ष सलमान खान, मासुक सिद्दीकी,  हुसेन खान, अलताफ शेख, आदिल शेख, जहांगीर खान आदी उपस्थित होते.

 
उत्तर मुंबईमध्ये ही निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी  आ. अतुल भातखळकर, आ. योगेश सागर, आ. मनीषा चौधरी, माजी खासदार गोपाळ शेट्टी, ज्येष्ठ नेते भाई गिरकर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आदी उपस्थित होते. हा निषेध मोर्चा काढून जनतेच्या मनातील संताप व्यक्त करण्यात आला. दहशतवादाची ही कीड लवकरात लवकर संपवावी असे आवाहनही यावेळी केंद्र सरकारला करण्यात आले.