पुण्यात ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट’चा कोनशिला समारंभ; आरोग्यसेवेत नवा आदर्श प्रकल्प उभारणार
पुणे, ता. १६ :
“लता म्हणजे आयुष्याची कोमल वेल आणि आशा म्हणजे जगण्याची उमेद,” अशा भावनिक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेशकर भगिनींच्या कार्याला उजाळा देत, त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय प्रकल्पाबद्दल विश्वास व्यक्त केला.
पुण्यात ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या कोनशिला समारंभाचा कार्यक्रम मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी बोलताना शिंदे यांनी सांगितले की, हा प्रकल्प केवळ उपचार देणारा नसून रुग्णांना नव्या आयुष्याची आशा देणारा ठरेल.
या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, तसेच मंगेशकर कुटुंबातील हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आनंद भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात शिंदे यांनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, “त्यांनी स्वरसमाधी घेतली आहे; त्यांचे स्वर अजरामर राहतील,” असे सांगितले. त्यांनी आशाताईंच्या संघर्षमय जीवनाचा उल्लेख करत त्या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान असल्याचे नमूद केले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गेली २५ वर्षे रुग्णांसाठी संजीवनी ठरल्याचा उल्लेख करत, नव्या प्रकल्पामुळे हजारो रुग्णांना जीवनदान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आजचा दिवस केवळ पुण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आहे,” असेही ते म्हणाले.
या प्रकल्पात म्युझिक थेरपी विभाग सुरू करण्याचा अभिनव प्रस्ताव त्यांनी मांडला. लता-आशांच्या सुरेल स्वरांमुळे रुग्णांच्या मनावर सकारात्मक परिणाम होईल, तसेच आधुनिक वैद्यकीय सुविधांबरोबर मानसिक उपचारांची जोड मिळेल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय मंगेशकर कुटुंबाचा संगीत वारसा जतन करणारे संग्रहालय उभारण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली.
शेवटी, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारकडून संपूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही देत शिंदे यांनी सांगितले की, “हा प्रकल्प हजारो रुग्णांच्या आयुष्यात ‘सूरसंजीवनी’ ठरेल.”