राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ : पुणे महापालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाला सिल्व्हर अवॉर्ड

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ : पुणे महापालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाला सिल्व्हर अवॉर्ड

पुणे, दि. ४ जून २०२६ : पुणे महानगरपालिकेने डिजिटल प्रशासन आणि नागरिकाभिमुख सेवांच्या क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभाग (DARPG) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ या महत्त्वाकांक्षी डिजिटल परिवर्तन प्रकल्पाची ‘ई-गव्हर्नन्स अंतर्गत जिल्हा/शहरी स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरील उपक्रम’ या श्रेणीत सिल्व्हर अवॉर्डसाठी निवड करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, प्रजीत नायर, ओमप्रकाश दिवटे आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेटर राहुल जगताप यांच्या सहकार्याने डिजिटल परिवर्तनाची व्यापक मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत महानगरपालिकेच्या संकेतस्थळाचे आधुनिकीकरण, विविध डिजिटल प्रणालींची पुनर्रचना, नागरिकाभिमुख ऑनलाइन सेवांची निर्मिती तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सेवा विकसित करण्यात आल्या.

या सर्व उपक्रमांचे सादरीकरण नवी दिल्ली येथे तज्ज्ञ समितीसमोर करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापन प्रक्रियेत ‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाची निवड करण्यात आली. विविध विभागांच्या समन्वयातून हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.

‘पीएमसी ३६०’ अंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन संकेतस्थळ, ऑनलाइन सेवा पोर्टल, तक्रार विश्लेषण व व्यवस्थापन प्रणाली, व्हॉट्सअॅपद्वारे नागरिक सेवा आणि माहिती वितरण यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे.

समृद्ध ऐतिहासिक वारसा जपत पुणे शहर डिजिटल प्रशासनातील देशातील अग्रगण्य शहरांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम करत आहे. ‘पीएमसी ३६०’ उपक्रमामुळे नागरिकांना जलद, पारदर्शक, सुलभ आणि विश्वासार्ह सेवा मिळत असून स्मार्ट गव्हर्नन्सच्या दिशेने पुणे महानगरपालिका नवा आदर्श निर्माण करत आहे.

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मधील हा मानाचा सन्मान पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञान भागीदार आणि सर्व पुणेकर नागरिक यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याची भावना महानगरपालिकेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.