पुण्यात १२ सप्टेंबरला भरती परीक्षा पद्धतीवर उच्चस्तरीय समितीची सल्लामसलत

पुण्यात १२ सप्टेंबरला भरती परीक्षा पद्धतीवर उच्चस्तरीय समितीची सल्लामसलत
पुण्यात १२ सप्टेंबरला भरती परीक्षा पद्धतीवर उच्चस्तरीय समितीची सल्लामसलत

पुणे, दि. ६ सप्टेंबर २०२६ : राज्यातील भरती परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीची पुणे विभागीय सल्लामसलत १२ सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहे.

सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणाऱ्या या सल्लामसलतीमध्ये विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा, विषयतज्ज्ञ आणि इतर संबंधित घटकांना सहभागी होता येणार आहे. भरती परीक्षेतील विविध टप्प्यांबाबतचे अनुभव, अडचणी, अपेक्षा आणि सुधारणा याविषयी या बैठकीत मते जाणून घेतली जाणार आहेत.

प्रश्नपत्रिका तयार करणे व परीक्षा केंद्र व्यवस्थापन, परीक्षेची सुरक्षितता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, उमेदवारांशी संवाद, तक्रार निवारण व्यवस्था आणि परीक्षा देतानाचा उमेदवारांचा अनुभव अशा विविध मुद्द्यांवर सूचना मांडता येणार आहेत.

पुणे महसूल विभागातील सल्लामसलतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थी, उमेदवार, संस्था आणि तज्ज्ञांनी आपल्या सूचना व अभिप्राय ११ सप्टेंबरपर्यंत Pune-ExamReformsTaskforce@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्राप्त सूचना आणि चर्चेसाठी आलेल्या विनंत्यांचा विचार करून संबंधित व्यक्ती व संस्थांना सल्लामसलतीतील चर्चेची वेळ कळविण्यात येणार आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी या सल्लामसलतीतून महत्त्वपूर्ण सूचना आणि अनुभव समितीसमोर मांडले जाणार आहेत.