बारामती ते लाकडी महामार्गावर पर्यावरणावर आघात! वन विभागाकडूनच रस्त्यालगतच्या झाडांना आग

बारामती ते लाकडी महामार्गावर पर्यावरणावर आघात! वन विभागाकडूनच रस्त्यालगतच्या झाडांना आग
 बारामती (प्रतिनिधी) 
बारामती ते लाकडी महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मार्फत रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनच आग लावण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या आगीत अनेक झाडे पूर्णपणे जळून खाक झाली असून, महामार्गालगतच्या परिसरातील पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
घटनास्थळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, ही आग वनाधिकारी बाळासाहेब गोलांडे यांच्या सांगण्यावरून लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेशिवाय असा प्रकार केला नसता, असेही कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
बारामती ते लाकडी महामार्गावरील ही झाडे वाहनचालकांना सावली देणारी, प्रदूषण कमी करणारी व परिसरातील तापमान संतुलन राखणारी होती. मात्र झाडे हटवण्यासाठी कोणतीही शास्त्रीय किंवा सुरक्षित पद्धत न वापरता थेट आग लावण्यात आल्याने झाडे जळून खाक झाली, तसेच महामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. यामुळे नागरिक व वाहनचालकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.
 
या आगीत झाडांसोबतच पक्षी, कीटक व लहान जीवसृष्टीचेही नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत असून, पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या विभागाकडूनच असा निष्काळजी व धोकादायक प्रकार घडणे अत्यंत गंभीर असल्याचे मत व्यक्त होत आहे.
 
या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.