भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर मुंबईत राज्यस्तरीय परिषद
मुंबई, दि. १५ ऑक्टोबर २०२६ : :(सौ.रूपाली मनोज बैसाने)
भटक्या विमुक्त जाती जमातींच्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्न आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर सखोल विचारमंथन करण्यासाठी विमुक्त भटके जनजाती विकास परिषद, अखिल भारतीय यांच्या वतीने मुंबईत राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत बोरिवली पूर्व येथील फुलपाखरू उद्यान परिसरातील शाहू महाराज संस्कार केंद्रात ही परिषद होणार आहे.
या परिषदेत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी कार्यरत विविध संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. समाजाची सद्यस्थिती, मूलभूत सुविधांचा अभाव, प्रलंबित मागण्या आणि राज्य तसेच केंद्र सरकारच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
परिषदेत भटक्या विमुक्त समाजासाठी नियुक्त विविध आयोगांच्या शिफारशी, शासनाच्या कल्याणकारी योजना, शासन निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणीतील अडचणींचा आढावा घेतला जाणार आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना, मूलभूत सुविधांची उपलब्धता आणि भविष्यातील कृती कार्यक्रम यावरही विचारमंथन होणार आहे.
राज्यभरातील विविध संस्था आणि संघटनांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्यात समन्वय वाढविणे, संघटनात्मक कार्याचा आढावा घेणे आणि समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एकत्रित प्रयत्न करणे हा परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.
या परिषदेला विमुक्त भटके जनजाती विकास परिषद, अखिल भारतीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि केंद्रीय भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाच्या विविध प्रश्नांवर संवाद आणि मुक्त चर्चा होणार आहे.
संघटनेचे राज्य, विभागीय आणि जिल्हा पदाधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य असून, भटक्या विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूर्वसूचना देऊन परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यवाह गिरीधर साळुंके यांनी केले आहे.