मुंबईत १० केंद्रांवर रोजगाराची मोठी संधी २९ सप्टेंबरला रोजगार महाकुंभाचे आयोजन
मुंबई, दि. ४ : मुंबई शहरातील बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या पुढाकाराने पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत २९ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील १० प्रमुख ठिकाणी एकाच वेळी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.
या मेळाव्यांमध्ये विविध शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य असलेल्या उमेदवारांना नामांकित कंपन्या तसेच विविध उद्योग क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. आयटी, बँकिंग, फायनान्स, इंजिनिअरिंग, रिटेल, ई कॉमर्स, हॉस्पिटॅलिटी, टुरिझम, ऑटोमोबाईल, लॉजिस्टिक्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि एमएसएमईसह अनेक क्षेत्रांचा यात समावेश आहे.
माहीम येथील सेंट झेविअर्स टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी क्षेत्रावर भर देण्यात आला आहे. भायखळा येथील अंजुमन इ इस्लाम येथे इंजिनिअरिंगपासून हॉस्पिटॅलिटीपर्यंत विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध असतील. फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रासाठी रोजगार मेळावा होणार आहे.
माटुंगा येथील श्रीमती मणीबेन एम पी शाह महिला महाविद्यालयात बँकिंग, अकाऊंटन्सी, फायनान्स, इन्शुरन्स, आयटी, रिटेल, ई कॉमर्स, लॉजिस्टिक्स आणि शिपिंग क्षेत्रातील संधी मिळणार आहेत. जय हिंद कॉलेजमध्ये आयटी, बँकिंग, रिटेल, ई कॉमर्स, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, स्टार्टअप्स आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील रोजगार उपलब्ध होणार आहे.
गुरु नानक खालसा महाविद्यालय, अंजुमन इ इस्लाम इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, बॉम्बे टेक्निकल स्कूल ऑफ इंजिनिअरिंग आणि एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर या केंद्रांवरही विविध क्षेत्रांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा तसेच विविध व्यावसायिक कौशल्ये असलेले पात्र उमेदवार या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून त्यांना नोकरीपूर्व तयारीसाठी मोफत प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
मुलाखतीची तयारी, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि सॉफ्ट स्किल्स याबाबत उमेदवारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
मुंबई शहरातील खासगी कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, बँका, आयटी कंपन्या, रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्रातील उद्योजकांनी आपल्या आस्थापनांमधील रिक्त पदांची माहिती संबंधित प्रक्रियेद्वारे नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईतील अधिकाधिक बेरोजगार युवक युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.