भटके विमुक्त समाजाने निवडणुकीत आपल्या मतांची ताकद दाखवावी प्रकाश आंबेडकर
पुणे : भटके विमुक्त समाजाला आपले हक्क आणि अधिकार मिळवून द्यायचे असतील तर निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मतांची ताकद दाखवणे आवश्यक आहे. मत विकण्याची प्रवृत्ती थांबवून स्वाभिमानाने मतदान करण्याचा निर्धार समाजाने करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
भटके विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी स्मारक सभागृहात राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आंबेडकर यांनी भटके विमुक्त समाजाच्या राजकीय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
ते म्हणाले की, आपल्या हक्कासाठी प्रत्येकाने गावागावात जनजागृती करणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या काळात आपले मत विकायचे नाही आणि इतरांनाही मत विकू द्यायचे नाही, असा निर्धार समाजाने केला पाहिजे. कष्टाच्या बळावर जीवन जगणाऱ्या समाजाने कोणाचीही गुलामगिरी किंवा लाचारी स्वीकारू नये. स्वाभिमान जपून आपल्या अधिकारांसाठी संघटितपणे संघर्ष करणे आवश्यक आहे.
१९९० मध्ये काढलेल्या बिऱ्हाड मोर्च्याची आठवण सांगताना आंबेडकर यांनी भटके विमुक्त समाजाच्या हक्कांसाठी झालेल्या संघर्षाचा उल्लेख केला. त्या काळात पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन लढा देण्यात आला. केवळ हॅबिट्युअल अॅक्टच्या आधारे कोणालाही गुन्हेगार ठरवता येणार नाही, ही भूमिका न्यायालयीन प्रक्रियेत मांडण्यात आली आणि त्यानंतर संबंधित कायदा रद्द झाला, असे त्यांनी सांगितले.
न्यायालय कायदा रद्द करू शकते, मात्र नवीन कायदे करण्याचे अधिकार विधिमंडळाच्या सभागृहांना आहेत. त्यामुळे भटके विमुक्त समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभेत समाजाचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
परिषदेचे संयोजक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी भटके विमुक्त समाजाला सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, असे सांगितले. समाजातील जनजागृतीसाठी राज्यभर मुसाफिर यात्रा काढण्यात आली असून विविध भटके विमुक्त समूहांशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर पुण्यात राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली.
ग्रामपंचायतपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत भटके विमुक्त समाजाने सक्रिय राजकीय सहभाग घेतला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधिमंडळापर्यंत समाजाचे प्रतिनिधित्व वाढल्याशिवाय प्रश्न प्रभावीपणे मांडले जाणार नाहीत, असे जाधव यांनी नमूद केले.
परिषदेत अंबरसिंग चव्हाण, ॲड. मंगेश ससाने, ॲड. अरविंद तायडे, प्राचार्य बाबुराव शिंदे, डॉ. दीपा राजमाने आणि अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी ॲड. डॉ. अरुण जाधव लिखित भटक्या विमुक्तांच्या पंचाहत्तरी या पुस्तकाचे प्रकाशन ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. शाहीर सचिन माळी, शीतल साठे आणि सहकाऱ्यांनी आंबेडकरी नवयान जलसा सादर केला.
परिषदेपूर्वी सारसबाग परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून भटके विमुक्त समाजातील पारंपरिक लोककलावंतांची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, वाद्य आणि नृत्याच्या माध्यमातून विविध कलाप्रकार सादर करण्यात आले. नंदीवाले, वासुदेव, पिंगळा जोशी, मरीआईवाले, गोंधळी, उंटवाले, रायरंद, बहुरूपी, गोसावी, चित्रकथी, डोंबारी, कोल्हाटी आणि नाथपंथी डवरी गोसावी यांसह विविध समाजघटकांचे प्रतिनिधी मिरवणुकीत सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. विजय जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. बाबुराव सुरपे यांनी आभार मानले.