वर्गणी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय कार्यालयाची परवानगी आवश्यक!
सार्वजनिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मंडळांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन
आगामी दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी पहाट आदी सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वर्गणी, देणगी किंवा प्रायोजकांकडून निधी संकलन करण्यापूर्वी धर्मादाय कार्यालयाची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे.
ट्रस्ट कायद्याच्या कलम ४१ सी नुसार सार्वजनिक प्रयोजनासाठी निधी संकलन करण्यास पूर्वपरवानगी आवश्यक असून, परवानगीशिवाय वर्गणी गोळा केल्यास सुधारित कलम ६६ क नुसार तीन महिन्यांपर्यंत साध्या कारावासाची शिक्षा तसेच विनापरवानगी जमा केलेल्या रकमेच्या दीडपट दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
धर्मादाय आयुक्तांकडे कायमस्वरूपी नोंदणीकृत असलेल्या मंडळांना निधी संकलनासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसली, तरी संस्थेची कागदपत्रे अद्ययावत ठेवणे आणि सर्व आर्थिक वर्षांची हिशोबपत्रके ऑनलाइन दाखल करणे आवश्यक आहे.
नोंदणीकृत नसलेल्या मंडळांनी ट्रस्ट कायद्याच्या कलम ४१ क अन्वये धर्मादाय कार्यालयाच्या संकेतस्थळावर विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर मिळालेला परवानगी क्रमांक छापील पावत्यांवर नमूद करणे आणि प्रत्येक वर्गणीदाराला पावती देणे बंधनकारक आहे.
कार्यक्रमानंतर जमा झालेला निधी, झालेला खर्च आणि शिल्लक रकमेचा हिशोब निर्धारित कालावधीत धर्मादाय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. उर्वरित रक्कम प्रशासन निधीत जमा करण्याची तरतूद आहे.
त्यामुळे सार्वजनिक उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांनी निधी संकलन करताना कायदेशीर नियमांचे काटेकोर पालन करावे. वर्गणीच्या अफरातफरीबाबत तक्रार झाल्यास संबंधितांवर गंभीर कारवाई होऊ शकते.
— एड. शिवराज कदम जहागिरदार
माजी अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे