वाचन प्रेरणा दिन वर्षभर साजरा व्हावा उदय सामंत

वाचन प्रेरणा दिन वर्षभर साजरा व्हावा उदय सामंत
वाचन प्रेरणा दिन वर्षभर साजरा व्हावा उदय सामंत
वाचन प्रेरणा दिन वर्षभर साजरा व्हावा उदय सामंत

मुंबई, दि. १५ : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा वाचन प्रेरणा दिन केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता वर्षातील ३६५ दिवस वाचनाची प्रेरणा देणारा असावा. मंत्रालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने पुढील वाचन प्रेरणा दिनापर्यंत किमान एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा, असे आवाहन मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, मंत्री डॉ. सामंत यांनी पुस्तक प्रदर्शन आणि विक्री केंद्रांना भेट दिली.

दहा दिवसांत दहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत मराठीचा प्रसार

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिची समृद्ध परंपरा, सांस्कृतिक वारसा, साहित्यिक योगदान आणि वाचन संस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठी भाषा विभागाने विशेष उपक्रम राबविला. राज्यातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व आणि तिची अभिजात परंपरा समजावून सांगणाऱ्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. अवघ्या दहा दिवसांत सुमारे दहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा विक्रम या उपक्रमाने केला असल्याचे डॉ. सामंत यांनी सांगितले.

आजच्या काळात वाचन संस्कृती कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी दैनंदिन जीवनात वाचनाची सवय रुजविण्याची गरज अधोरेखित केली. केवळ वाचन प्रेरणा दिन साजरा करून अपेक्षित उद्दिष्ट साध्य होणार नाही, तर वर्षभर वाचनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठी भाषेचा वापर दैनंदिन व्यवहारात वाढवा

मराठी भाषा शिकविण्याच्या उपक्रमांतर्गत सुमारे एक लाख ६७ हजार जणांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, मराठी भाषिकांनी दैनंदिन व्यवहारात मराठीतून संवाद साधण्याची सवय लावल्यास इतर भाषिकांनाही मराठी शिकणे सहज शक्य होईल, असा विश्वास डॉ. सामंत यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर येथील एका रिक्षाचालकाचा अनुभव सांगताना त्यांनी मराठी भाषेच्या दैनंदिन वापराचे महत्त्व स्पष्ट केले. महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेल्या या रिक्षाचालकाला मराठी शिकण्याची गरज भासली. मराठी प्रवाशांनी त्याच्याशी मराठीतून संवाद साधला असता, तर त्याला ही भाषा सहज शिकता आली असती. त्यामुळे मराठी भाषेचा अभिमान केवळ बोलण्यातून नव्हे, तर प्रत्यक्ष व्यवहारातूनही व्यक्त व्हावा. प्रत्येकाने मराठी भाषेचा वापर स्वतःपासून सुरू करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य द्यावे

मंत्री डॉ. सामंत यांनी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण सांगत मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. बालवयापासूनच मुलांमध्ये भाषेची आवड निर्माण होणे आणि मातृभाषेतून शिक्षणाची पायाभरणी होणे आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत मातृभाषेचा प्रभावी वापर व्हावा, अशी डॉ. कलाम यांची भूमिका होती, असे त्यांनी सांगितले.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना मराठी भाषेतून तांत्रिक शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. महाराष्ट्रात बी.टेक. आणि एम.टेक.चे शिक्षण मराठी भाषेतून घेण्याची संधी उपलब्ध होणे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकासासोबतच समाजाची वैचारिक समृद्धी साध्य होते. त्यामुळे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने वर्षभरात किमान एक पुस्तक वाचावे आणि वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. सामंत यांनी केले.

पुस्तक प्रदर्शनाला दोन दिवसांची मुदत

यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सहसचिव डॉ. नामदेव भोसले आणि भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गिते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी पुस्तक प्रदर्शनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पुस्तकांशी संपर्क वाढावा, त्यांनी पुस्तकांची खरेदी करावी आणि प्रत्यक्ष वाचनाला प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी भाषा विभागाच्या वतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात १५ आणि १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पुस्तक प्रदर्शन आणि विक्री केंद्रे सुरू राहणार आहेत. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांनी या प्रदर्शनाला भेट देऊन पुस्तके खरेदी करावीत आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले.