सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन
पुणे : संवाद, सहभाग, संपर्क, संवर्धन आणि सहजानंद हे सांस्कृतिक धोरणाचे मुख्य पैलू आहेत. सांस्कृतिक धोरणात मानवाच्या उगमापासून कृत्रिम बुद्धीमत्तेपर्यंतचा विचार करण्यात आला आहे. पुढील 25 वर्षांच्या दूरदृष्टीचा त्यात समावेश असल्याचे मत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी व्यक्त केले.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या 150व्या ज्ञानसत्रातील जयंतराव टिळक स्मृती व्याख्यानात ‘महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण’ या विषयावर शेलार बोलत होते. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, कार्यवाह डॉ. गीताली टिळक यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणात 172 तरतुदींचा समावेश आहे. 2010 मध्ये पहिले धोरण मांडण्यात आले. 2024 मध्ये दुसरे धोरण तयार करण्यात आले. या धोरणात लोककला, लोक परंपरा, चित्रकला, नृत्य, नाटक, चित्रपटांचा समावेश आहे. शक्ती, भक्ती आणि मुक्तीत महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण सामावले आहे. राज्यात प्रत्येक 24 कि.मी. नंतर लोककला बदलतात. त्यामुळे राज्यातील सांस्कृतिक केंद्र आणि सांस्कृतिक संस्थांना बळकटी देण्यासंदर्भातही आर्थिक तरतुदीची व्यवस्था करण्यात आले असल्याचे नमूद करून शेलार म्हणाले, नव तंत्रज्ञानाचा वापर करून पुढच्या वर्षीच्या वसंत व्याख्यानमालेत स्वत: लोकमान्य टिळक लोकांशी संवाद साधत आहेत. असे व्याख्यान झाले पाहिजे! त्यासाठी राज्याचा माहिती व तंत्रज्ञान विभाग सर्व प्रकारचे सहकार्य करेल.
राज्यातील 12 गड आणि किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून युनोस्कोचा टॅग लागावा यासाठी सांस्कृतिक विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच शौर्याचा वारसा सांगणार्या गड, किल्ल्यांचे जतन व संवर्धन, प्रचार आणि प्रसारासाठी हा विभाग प्रयत्नशील आहे. शंकराचे तांडव हे पहिले नृत्य आहे. राज्यासह देशात सृजनशिलतेचा खजिना आहे. संस्कृती समाजातील प्रत्येक घटकाला जोडली गेली आहे. तीची व्याप्ती मोठी आहे. मानवी मनाचा विकास आणि मानवी शरीराची उत्पत्ती म्हणजे आपली संस्कृती आहे. प्राचीन, पराक्रमी, वैभवसंपन्न व पराक्रम मांडणारा आपला महाराष्ट्र असल्याचेही आशिष शेलार यांनी सांगितले.
प्रारंभी आशिष शेलार, डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते न्या. रानडे, लोकमान्य टिळक व जयंतराव टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. वक्तृत्वोत्तेजक सभेचे कार्यकारिणी सदस्य रामदास नेहूलकर यांनी सुत्रसंचालन केले.
चौकट
व्याख्यानमालेची जागतिक वारसा म्हणून नोंद व्हावी
जागतिक वारसा जपणार्या सर्व गोष्टींची नोंद युनोस्कोतर्फे घेतली जात आहे. कोणत्याही साधनाची व्यवस्था नसणार्या काळात न्या. रानडे, लोकमान्य टिळकांनी विचारांचा जागर आणि जन प्रबोधन करणारी वसंत व्याख्यानमाला सुरू केली. आज ही व्याख्यानमाला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. 150 वर्षे साजरी करणारी देशातील ही एकमेव व्याख्यानमाला आहे. त्यामुळे या व्याख्यानमालेची जागतिक वारसा म्हणून युनोस्कोने दखल घ्यावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही आशिष शेलार यांनी यावेळी दिली.
चौकट
जयंतराव टिळक हे अनेक संस्थांचे आधारवड
गोवा मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा उभा करण्यात जयंतराव टिळक यांचा मोठा सहभाग होता. या दोन्ही चळवळीचे ‘केसरीवाडा’ हे केंद्रबिंदू होते. तसेच ते निसर्गप्रेमी होते. शिकार हा त्यांचा छंद होता. पानशेत पुरात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. अनेक सामाजिक संस्थांचे ते आधारवड होते. सांस्कृतिक मंत्री असताना त्यांनी अनेक संस्थांना भरघोस मदत केली. वयाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर त्यांनी बहुतांश संस्थांच्या पदाचा राजीनामा दिला. दादांनी संपूर्ण आयुष्यच सामाजिक कार्यासाठी समर्पित केले. सर्व क्षेत्रात वावर असणार्या व्यक्तींच्या कार्याची पुढच्या पिढीला ओळख व्हावी म्हणून व्याख्यानातून त्यांच्या स्मृती जपल्या जात असल्याचे वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी प्रास्ताविकात सांगितले.