स्वेरीत सातवा 'मासिक योग दिन' साजरा

स्वेरीत सातवा 'मासिक योग दिन' साजरा

पंढरपूर- ‘सध्या केवळ योग दिन किंवा प्रशिक्षण सुरू असताना, आजार झाल्यानंतर व कार्यशाळा असेपर्यंत व्यायाम केला जातो. परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनाच्या शांतीसाठी नियमित व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. व्यायाम केल्यामुळे आपले आरोग्य आणि मन प्रसन्न राहते. करत असलेल्या कार्यात सकारात्मकता निर्माण होते, उत्साह वाढतो. म्हणून योगा, प्राणायम, व्यायाम करण्यात सातत्य हवे. यामुळे आपल्यातील उत्साह टिकून राहतो.’ असे प्रतिपादन स्वेरीच्या योग प्रशिक्षिका सुप्रिया शेंबडे यांनी केले.


         प्रत्येक वर्षी दि.२१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थात जगभरात साजरा केला जातो. दि.२१ जून रोजी स्वेरीत मुख्य ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी यापुढेही ‘स्वेरी अंतर्गत असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महिन्याच्या दि.२१ तारखेला सामुहिक ‘योग दिन’ साजरा करण्याचे घोषित केले होते. तेंव्हापासून प्रत्येक महिन्याच्या दि. २१ तारखेला न चुकता स्वेरीत ‘योग दिन’ घेतला जातो. मंगळवार, दि. २१ जानेवारी २०२५ हा स्वेरीमध्ये ‘सातवा योग दिन’ साजरा करण्यात आला. अभियांत्रिकीच्या दुसऱ्या, तिसऱ्या व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. परंतु स्वेरी च्या ‘योगा डे’ मध्ये खंड न पाडता डिप्लोमाच्या व वसतीगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी प्रचंड प्रतिसाद दिला. विठ्ठलाचे अभंग आणि गणेश वंदनेने या ‘योगा डे’ची सुरवात झाली. पुढे स्वेरीच्या योग प्रशिक्षिका सुप्रिया शेंबडे यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनी,  प्राध्यापक यांच्याकडून पुढे तासभर विविध प्राणायम करवून घेतले. विविध आसने, भस्रीका प्राणायम तसेच श्वास, फुफुस्से, सांधे, पोटाचे, अवयवांचे विविध प्रकार करून घेतले. या योग सरावानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर अधिक उत्साह दिसून येत होता. मार्गदर्शन करताना प्रशिक्षिका सुप्रिया शेंबडे पुढे म्हणाल्या की, ‘नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेतल्यास मनात सकारात्मक विचार येवून मन प्रसन्न राहते. म्हणून प्राणायम, योगा नियमित करण्याची गरज आहे. यामुळे मनाची एकाग्रता वाढते.’ असे सांगून ‘योगा’ चे होणारे फायदे सांगितले. वसतिगृहातील विद्यार्थिनी मयुरी चौगुले म्हणाल्या की, ‘पूर्वी मी उशिरा उठायचे, स्वेरीत आल्यावर प्राणायम करण्याचे मनावर घेतले. आता मी नियमित लवकर उठते. करत असलेल्या प्राणायमामुळे मनात सकारात्मकता येते. आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्राणायम करणे गरजेचे आहे याची खात्री पटते.’ असे सांगून स्वेरीने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचे आभार मानले. सदरचा कार्यक्रम स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, वसतिगृह व्यवस्थापक डॉ. के.बी. पाटील, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख,प्राध्यापक वर्ग, इंजिनिअरींग व फार्मसीच्या विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रा. रजनी पटेल यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
 
चौकट:
वसतिगृहात होतोय दररोज योगा क्लास- स्वेरी अंतर्गत असलेल्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहात विद्यार्थीनींच्याच मागणीनुसार दररोज पहाटे ५ ते ६ या वेळेत विद्यार्थिनीकडून योगा करवून घेतला जातो. स्वेरीच्या योग प्रशिक्षिका सुप्रिया शेंबडे ह्या विविध प्राणायम करून घेतात. यात जवळपास १७५ ते २०० विद्यार्थिनी नियमित प्राणायम करतात. प्राणायम केल्यामुळे विद्यार्थिनी अधिक उत्साही दिसत आहेत.