“कुल” कडून उच्च न्यायालयातील याचिका मागे ; अभय योजनेंतर्गत शास्तीमध्ये मिळणार तब्बल १ कोटी ३७ लाखांची सूट

पनवेल,दि.04 : पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत करदात्यांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत शास्तीवरती ९० टक्के सुट राहणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्तांधारकांबरोबरच तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मालमत्ताधारकांना अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी केले आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मालमत्ताधारकांनी अभय योजनेचा लाभ घेण्यास सरुवात केली आहे. यामध्ये कुल सोल्यूशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने देखील “अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी उच्च न्यायालयातील मालमत्ता कराबाबत असणारी याचिका मागे घेतली आहे. उच्च न्यायालयात जमा केलेले ३ कोटी रुपये आता पनवेल महानगरपालिकेत जमा होणार आहेत. अभय योजनेत भाग घेतल्यास “कुल” ला तब्बल 1 कोटी 37 लाख इतका फायदा होणार आहे.
पनवेल महानगरपालिकेमार्फत आकारण्यात येणार मालमत्ता कर हा कायदेशीर असल्याची जाणीव झाल्याने आता अनेक कंपन्यांनी अभय योजनेचा मार्ग स्वीकारून कर भरण्याचा पर्याय निवडत असल्याचे दिसून येत आहे.“अभय योजना” ही कंपन्यांसाठी एक सुवर्ण संधी असून सर्व मालमत्ता कर एकरकमी भरल्यास शास्तीच्या रकमेत ९० टक्के म्हणजे मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. त्यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीमधील इतर मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन उपायुक्त स्वरूप खारगे यांनी केले आहे.
महापालिकेच्या वतीने करदात्यांना ई-बिल स्वीकारणे, डिजिटल पद्धतीने कर भरणे यासाठी प्रोत्साहित केले जात असून, असे केल्यास अतिरिक्त 2 टक्के सवलतीचा लाभ मिळू शकतो. तसेच ऊर्जा बचत, जल पुनर्भरण, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक उपक्रम यामध्ये सहभाग घेणाऱ्या करदात्यांना देखील 2 टक्के सवलतीची तरतूद करण्यात आली आहे.
चौकट
पनवेल महानगरपालिकेच्या panvelmc.org या अधिकृत संकेतस्थळावर तसेच PMC TAX APP आणि Panvel Connect App द्वारे ऑनलाइन कर भरता येणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन प्रलंबित कर तत्काळ भरावा, असे आवाहन आयुक्त उपायुक्त स्वरूप खारगे यांनी केले आहे
ही अभय योजना 24x7 सुरू असून यासाठी महापालिकेने नवीन मालमत्ता कर संकलन केंद्रे सुरू केली आहेत.
1. मालमत्ता कर संकलन केंद्र – प्राईड सोसायटी सेक्टर 7, खारघर
2. महा ई सेवा केंद्र – गंगा टॉवर, सेक्टलर 21 कामोठे
3. महा ई सेवा केंद्र – ऍलियश बिल्डींग से17 प्लॉट नं84 मोठा खांदा नवीन पनवेल
4. सर्व 5 प्रभाग कार्यालये (नावडे उपविभागासहित)
5. मुख्यालय पनवेल
तरी आत्ता आणि एकदाच असलेल्या अभय योजनांचा लाभ संबधित नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
चौकट
कर-मित्र’ चॅटबॉट
नागरिकांना अधिक सोयीस्कर, वेगवान आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने ‘कर-मित्र’ चॅटबॉटची सुविधा सुरू करण्यात आली आहे.. हा अत्याधुनिक चॅटबॉट मालमत्ता करदात्यांना घरबसल्या त्वरित माहिती, मार्गदर्शन आणि ऑनलाइन मदत पुरवेल.