पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचाही सहभाग
मुंबई, दि. १४ : जागतिक कीर्तीचे तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या प्रथम स्मृतिदिनी, त्यांना 'जागतिक अभिवादन' करण्यासाठी ' राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ५० हून अधिक कलावंत, विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब 'माइस्ट्रो फॉरएव्हर' या दोन दिवसीय कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. एन सी पी ए तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या अनेक कलावंतांनी उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासोबत कला सादर केलेली होती, तसेच त्यांचे उस्तादजींसोबत वैयक्तिक अनुबंधही होते. या कलावंतांच्या यादीत जॉन मॅक्लॉघलिन, लुई बँक्स, डेव्ह हॉलंड, गणेश राजगोपालन, रणजीत बारोट, व्ही. सेल्वागणेश, शंकर महादेवन, ख्रिस पॉटर, संजय दिवेचा, गिनो बँक्स, अजय चक्रवर्ती, अमजद अली खान आणि राकेश चौरसिया यांसारख्या प्रतिष्ठित नावांचा समावेश आहे.
या दोन दिवसीय अभिवादन कार्यक्रमात- संगीत मैफली, व्याख्यान-प्रात्यक्षिके, चर्चासत्रे, उस्तादजींचा जीवनप्रवास रेखाटणारे छायाचित्र प्रदर्शन आणि माहितीपट... अशा अनेक बाबींचा समावेश आहे... ज्यामुळे प्रेक्षकांना उस्ताद झाकीर हुसेन यांचे जीवन आणि सांस्कृतिक वारशाचे बहुआयामी आणि हृदयस्पर्शी दर्शन घडेल.
कलावंत आणि चाहत्यांसोबत, उस्तादजींच्या पत्नी अँटोनिया, मुली अनिसा आणि इझाबेला, तसेच त्यांचे भाऊदेखील या अभिवादन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तबल्याला नवीन ओळख देणाऱ्या आणि पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या या महान अद्वितीय कलावंताच्या आठवणी जागवण्यासाठी, त्याला अभिवादन करण्यासाठी हे सारे एकत्र येणार आहेत.
दोन दिवसांचा हा स्मृती महोत्सव १४ आणि १५ डिसेंबर रोजी, सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत NCPA च्या विविध मंचांवर आयोजिलेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग देखील या उपक्रमात आपला सहभाग नोंदवत, उस्तादजींना मानवंदना देण्यादृष्टीने प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तर्फे या उपक्रमातील निवडक कार्यक्रमांचे सादरीकरण करत आहे. अकादमीच्या प्रभादेवी येथील नूतनीकरण झालेल्या अतिशय सुसज्ज अशा मिनी थिएटर मध्ये रसिकांसाठी या कार्यक्रमांचे विनामूल्य सादरीकरण होणार आहे.
राज्य शासनाचा सांस्कृतिक विभाग व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांनी रसिकांना या कार्यक्रमाचे आग्रहाचे आमंत्रण दिलेले आहे. सोमवार दिनांक १५ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात ९ ते ११:३० व सायंकाळच्या सत्रात ६:३० ते ९ या वेळात रसिकांनी उपस्थित रहावे आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
सोमवार, १५ डिसेंबर
सकाळचे सत्र - ९ ते ११:३०
स्वरांजली : भारतीय संगीत
° अजॉय चक्रवर्ती - गायन
° ईशान घोष - तबला
° अजय जोगळेकर - हार्मोनियम
° अमजद अली खान, अमान अली बंगश व अयान अली बंगश - सरोद
° आदित्य कल्याणपूर व अमित कवठेकर - तबला संगत
-------------------------------
सायंकाळचे सत्र - ६:३० ते ९
° फजल कुरेशी - तबला
° तौफिक कुरेशी - जेेम्बे
° योगेश सम्सी - तबला
° राकेश चौरसिया - बासरी
° श्रीधर पार्थसारथी - मृदुंग
° विजय प्रकाश - गायन
° अजय जोगळेकर - हार्मोनियम
° संगीत हळदीपूर - पियानो
° शिखरनाद कुरेशी - जेम्बे व तालवाद्य
° नवीन शर्मा - ढोलकी
° जॉर्ज ब्रुक्स - सॅक्सोफोन
° सोबत पंजाब घराण्याचा शिष्यवृंद