पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती

जीएसटी सुधारणा हे विकसित भारत 2047 च्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल 

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन

लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती झाली आहे. 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या निर्णायक नेतृत्वाची देशाला गरज आहे, या शब्दांत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी पंतप्रधान मोदी यांना 75 व्या वाढदिवसाच्या  शुभेच्छा दिल्या. जीएसटी सुधारणा हा आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत-2047 च्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. जीएसटीतील परिवर्तनकारी आणि ऐतिहासिक सुधारणांचे श्रेय श्री.गोयल यांनी पंतप्रधानांना दिले. मोदी हे नेहमी विकासाच्या सकारात्मक राजकारणाला प्राधान्य देतात, विरोधकांचे नकारात्मक राजकारण आणि विचारसरणी जनता स्विकारत नाही असेही श्री. गोयल यांनी नमूद केले. 
श्री.गोयल म्हणाले की, 24 वर्षे जनसेवेसाठी वाहून घेतलेल्या या नेत्याने निस्वार्थ भावनेने काम केले. संपूर्ण जगाचे लोकप्रिय नेते असलेल्या मोदीजींनी जगात भारताचा आणि भारतीयांचा मान वाढवला. मोदी हे जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती असून त्यांना वेगवेगळ्या देशांमधून एकूण 27 पेक्षा जास्त सर्वोच्च सन्मान मिळाले आहेत. मोदींसारख्या संवेदनशील नेतृत्वाने गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी या चार गटांच्या कल्याणाला सातत्याने प्राधान्य दिले. वंचित, गरीब घटकांच्या सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटून त्यांनी गरीब कल्याणाच्या अनेक योजना आणि निर्णय घेतले. आज पंतप्रधानांनी त्यांच्या वाढदिवशी मध्यप्रदेशच्या पावन भूमीतून देशभरातील महिला आणि बालकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिनाभर चालणारा ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ कार्यक्रम देशाला समर्पित केला असेही ते म्हणाले.   


देशाच्या सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देताना पंतप्रधानांनी देशाच्या समृद्ध वारशाचे जतन केले. ‘ॲक्ट इस्ट’ धोरण अवलंबत पूर्वोत्तर प्रदेशांच्या विकासाला चालना दिली. मध्यम वर्ग आणि निम्न मध्यमवर्गाचे जीवनमान सुधारण्यासाठी आयकर सूट आणि जीएसटी सुधारणा या दोन मोठ्या भेटी पंतप्रधान मोदींनी दिल्या. जीएसटी सुधारणांचे सुतोवाच पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्टला केले होते त्याची अंमलबजावणी नवरात्रौत्सवाआधी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देत अर्थव्यवस्थेला बळकटी दिल्याचेही श्री. गोयल म्हणाले. जीएसटी सुधारणांमुळे अर्थव्यवस्था गतीमान होणार आहे. या सुधारणांमुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढेल, व्यापारातील गती वाढेल, उद्योगांचे उत्पादन वाढेल, गुंतवणूक वाढ  व  रोजगारनिर्मितीला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या सुधारणांमुळे शेतकरी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, महिला, युवक, छोटे व्यापारी तसेच मध्यमवर्ग यांना दिलासा मिळणार आहे. तसेच आरोग्यविषयक सेवाही अधिक परवडणाऱ्या होतील असे केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले. उद्योगांनी या सुधारणांचे संपूर्ण फायदे ग्राहकांना देण्याचे आवाहनही त्यांनी केले. 
श्री. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे देशभर ‘सेवा पंधरवडा’ उपक्रम राबण्यात येत असल्याचेही श्री.गोयल म्हणाले. 2 ऑक्टोबर पर्यंत चालणार्‍या या मोहिमेअंतर्गत भाजपा तर्फे देशभरात रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण आणि प्रदर्शन आदी अनेक लोकोपयोगी कार्यक्रम होणार असल्याचे श्री. गोयल यांनी सांगितले.