आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेसवर भाजपचा निशाणा

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेसवर भाजपचा निशाणा

मुंबई, २८ ऑगस्ट २०२६

पुण्यात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय वापर केला जात असल्याचा आरोप भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बन यांनी सांगितले की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने आतापर्यंत तीन वेळा सविस्तर चर्चा केली असून विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्याबाबत सरकारकडून लिखित आश्वासनही देण्यात आले आहे. असे असतानाही आंदोलन सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असल्याचा दावा त्यांनी केला.

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांशी तीन वेळा चर्चा केली असून गरज भासल्यास पुन्हा चर्चेसाठी सरकार तयार असल्याचे बन यांनी स्पष्ट केले. आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राजकीय स्वरूप देऊन आंदोलनाचा वापर पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोपही बन यांनी केला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत बन यांनी काँग्रेस नेत्यांवरही प्रश्न उपस्थित केले. ज्या आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला, त्या संस्थेशी संबंधित काँग्रेसच्या माजी खासदार आणि आमदारांवर काय कारवाई करण्यात आली, असा सवाल त्यांनी राहुल गांधी, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांना केला.

रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीच्या निर्णयाचेही बन यांनी समर्थन केले. अनेक ज्येष्ठ रिक्षाचालकांचे शिक्षण मर्यादित असल्याने त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावरही बन यांनी टीका केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना जनतेने योग्य उत्तर दिल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला.