गावदेवी भाजी मार्केट आग दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिका सेवेत नियुक्ती
ठाणे : गावदेवी भाजी मार्केट येथे २१ मे २०२६ रोजी लागलेली आग विझविताना ठाणे अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी सागर शिंदे आणि आरक्षक काळू गाडेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर महापालिका सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार स्वर्गीय सागर शिंदे यांच्या पत्नी माधुरी शिंदे यांना ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत नियुक्त करण्यात आले आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक दिलीप बारटक्के, संजय वाघुले, नारायण पवार, अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन राठोड, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप आणि मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीष झळके उपस्थित होते.
दरम्यान, स्वर्गीय आरक्षक काळू गाडेकर यांचा मुलगा तेजस गाडेकर याला दुर्घटनेनंतर एका महिन्याच्या आत महापालिका सेवेत सामावून घेण्यात आले होते. या नियुक्त्यांमुळे दोन्ही कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.