दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड टाळा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड टाळा

हिंगोली, दि. १९ (जिमाका) : जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थिती, पावसाचे अनिश्चित प्रमाण आणि भूजल पातळीत होणारी संभाव्य घट लक्षात घेता, शेतकऱ्यांनी आगामी हंगामातील पीक निवडताना उपलब्ध पाण्याचा विचार करून नियोजन करावे. पाणीटंचाईची शक्यता असलेल्या भागांत ऊस, केळी आणि उन्हाळी भुईमूग यांसारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड टाळून कमी पाण्यात येणाऱ्या पर्यायी पिकांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीमुळे उपलब्ध जलसाठ्यांचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्यास त्यांच्या वाढीवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान, जमिनीचा प्रकार, जमिनीतील ओलावा आणि उपलब्ध सिंचन सुविधा यांचा विचार करून पेरणी व लागवडीचे नियोजन करावे.

परिस्थितीनुसार रब्बी ज्वारी, मका, सुदान गवत, सुगरग्रेझ, हरभरा, तीळ तसेच योग्य कडधान्ये आणि तेलबिया या कमी पाण्यात येणाऱ्या पर्यायी पिकांचा विचार करावा. पीक निवडताना स्थानिक परिस्थितीनुसार कृषी विद्यापीठांनी केलेल्या शिफारशींचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शेतीसाठी उपलब्ध पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने ठिबक आणि तुषार सिंचनासारख्या आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करावा. पेरणीपूर्वी पर्जन्यमानाचा अंदाज, जमिनीतील ओलावा आणि सिंचनासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन पीक नियोजन करावे.

संभाव्य दुष्काळाचा परिणाम कमी करणे, उपलब्ध जलसाठ्यांचे संरक्षण करणे आणि शेतीतील आर्थिक जोखीम कमी करणे यासाठी शेतकऱ्यांनी योग्य पीक नियोजन करावे. पाणीटंचाईची शक्यता असलेल्या भागांत पर्यायी पिकांची निवड करून संभाव्य नुकसान टाळण्याचा प्रयत्न करावा. परिस्थितीनुसार आवश्यक पुढील सूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.