दृष्टीबाधित विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; नवीन शैक्षणिक वर्षाची मंगल सुरुवात
KS News सोलापूर प्रतिनिधी संदेश कांबळे
सोलापूर दिनांक 15 जून 2025 : मा. सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे विभाग प्रमुख श्री. रामचंद्र कुलकर्णी सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नॅब संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अंकुश कदम सर यांची उपस्थिती लाभली.
यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच पुष्पवृष्टी करून मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिक्षणासोबतच कौशल्य विकास, स्वावलंबन आणि आत्मविश्वास वाढविण्याचे आवाहन केले. दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या आणि जिद्दीच्या जोरावर समाजात आदर्श निर्माण करावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
या स्वागत समारंभामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले. संस्थेच्या वतीने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाची प्रेरणादायी सुरुवात मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. रियाज मुल्ला, आकांक्षा भंडारे मॅडम, पृथ्वी शिंदे मॅडम, शुभम वांजरे आणि संदेश कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि संस्थेबद्दलची आपुलकी अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.