पनवेलमध्ये समाज विकासासाठी बैठक बुद्धविहार आणि समाज कल्याण केंद्र उभारणीवर चर्चा
पनवेल, दि. १६ : समाजाची शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नती साधण्यासाठी विविध विधायक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील सभागृहात समाज स्वास्थ्य या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीला महापौर नितीन पाटील, सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, प्रभाग समिती ड चे सभापती अजय बहिरा, मोहन गायकवाड आणि सुभाष गायकवाड उपस्थित होते.
बैठकीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विधायक सूचना मांडण्यासह स्वतंत्र बुद्धविहार उभारणे, समाज कल्याण केंद्राची निर्मिती करणे आणि महानगरपालिकेच्या पाच टक्के मागासवर्गीय कल्याण निधीतून समाजोपयोगी कामे राबविणे यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
समाजाच्या विकासासाठी केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीतून ठोस कार्यक्रम राबविणे, समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे आणि उपलब्ध शासकीय निधीचा योग्य विनियोग करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजबांधवांनी एकत्र येऊन विधायक सूचना मांडाव्यात तसेच विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीला समाजातील विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.