पनवेल महापालिका मुख्यालयात बिरसा मुंडा जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

पनवेल महापालिका मुख्यालयात बिरसा मुंडा जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

पनवेल, दि. १५ : आदिवासी समाजाचे महानायक, थोर स्वातंत्र्यसेनानी आणि जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीविरोधात आदिवासी समाजाला संघटित करून संघर्ष केला. आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीवरील हक्कांसाठी त्यांनी लढा उभारला. १८९९-१९०० या काळात त्यांनी केलेला 'उलगुलान' अर्थात महान उठाव हा ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या आदिवासी प्रतिकाराचा महत्त्वपूर्ण अध्याय ठरला.

आदिवासी समाजात सामाजिक जागृती निर्माण करणे, अंधश्रद्धा आणि अन्यायकारक प्रथांविरोधात जनजागृती करणे तसेच समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणे, असे महत्त्वपूर्ण कार्य बिरसा मुंडा यांनी केले. त्यांच्या योगदानामुळे आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाच्या आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले आहे.

या कार्यक्रमास प्रभाग समिती 'ड'चे सभापती अजय बहिरा, सामान्य प्रशासन विभागप्रमुख कीर्ती महाजन, लिपिक विष्णू सांगळे, अग्निशमन दलाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच नागरिक उपस्थित होते.