पीएमआरडीएकडून अनाधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू; तीन द‍िवसात ९०४ अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पीएमआरडीएकडून अनाधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू; तीन द‍िवसात ९०४ अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पिंपरी:-
पुणे शहराभोवती असणाऱ्या राष्ट्रीय,राज्यमार्गावरील अनधिकृत बांधकामे न‍िष्कासन करण्याची मोहीम गत तीन द‍िवसापासून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु आहे. यात ३ ते ५ मार्चदरम्यान व‍िव‍िध भागातील अनधिकृत बांधकामांवर लक्ष्य करण्यात येत असून एकूण ९०४ अनधिकृत बांधकामे निष्कास‍ित करण्यात आली. या कारवाईमुळे न‍िश्च‍ितच संबंध‍ित भागातील वाहतुक कोंडी सोडव‍िण्यास मदत होणार आहे.  
पुणेकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी पीएमआरडीएने व‍िशेष मोहीम हाती घेण्यात आली असून बुधवारी (दि.५) पुणे नाशिक रोड, पुणे सोलापूर रस्ता व पुणे चांदणी चौक ते पौड रस्ता अतिक्रमण व अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सकाळी 9:30 वाजेपासून सुरु करण्यात आलेल्या या कारवाई जवळपास 252 अनधिकृत बांधकाम (25,200चौ.फु.) चे निष्कासन करणेत आले. बहुतांश स्थानिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतले. या अतिक्रमण न‍िष्कासन मोह‍िमेच्या पह‍िल्याच द‍िवशी ३ मार्चला २०१ अनधिकृत बांधकाम (2०,१00चौ.फु.) तर ४ मार्चला ४५३ अनधिकृत बांधकामे (४५,३00चौ.फु.) काढण्यात आली. गत तीन द‍िवसात एकूण ९०४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून ९० हजार ६०० चौरस मीटरचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.  यावेळी उपस्थित अधिकारी यांचेमार्फत सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम करू नये असे, आवाहन करण्यात आले. 
संबंध‍ित कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी पाटील, कनिष्ठ अभियंता गणेश जाधव, हरिष माने, ऋतुराज सोनावणे, प्रितम चव्हाण, दिप्ती घुसे, सागर जाधव, दिपक माने, प्रशांत चौगले, तेजस मदने, विष्णू आवाड यांच्यासह स्थानिक पोलिस कर्मचारी यांनी पार पाडली. पीएमआरडीए हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे सुरु  असून संबंध‍ित अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई सुरुच राहणार असल्याचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी स्पष्टकेले.