पुण्यात ‘लोकसंवाद’ उपक्रमाला प्रारंभ गणेश मंडळांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती
पुणे, दि. १६ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने ‘लोकसंवाद २०२६’ या जनजागृती अभियानाला पुणे शहरात प्रारंभ झाला. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गुरुजी तालीम गणेश मंडळ आणि तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळ येथे लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत असल्याने या माध्यमातून शासकीय लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. नागरिकांशी थेट संवाद साधणे, योजनांची माहिती देणे आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
गुरुजी तालीम मंडळात कौशल्य विकासावर मार्गदर्शन
गुरुजी तालीम गणेश मंडळ येथे कौशल्य विकास व रोजगार अधिकारी दिग्विजय जमादार यांनी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती दिली. युवकांसाठी उपलब्ध कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगाराच्या योजनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
युवकांनी आपली आवड आणि शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि रोजगार व स्वयंरोजगारासाठीच्या शासकीय योजनांचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
तांबडी जोगेश्वरी मंडळात महिला बालविकास योजनांची माहिती
तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळ येथे महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. महिला व बालविकास निरीक्षण गृहाचे अधीक्षक गजानन चाटे यांनी महिला आणि बालकांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण, संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.
महिलांसाठीच्या कल्याणकारी योजना, बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाच्या संधी तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या योजनांचा पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
योजनांची अधिकृत माहिती थेट नागरिकांपर्यंत
लोकसंवाद २०२६ अंतर्गत गणेश मंडळांच्या ठिकाणी संबंधित विभागांचे अधिकारी आणि प्रतिनिधी नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. नागरिकांच्या प्रश्नांना संबंधित विभागाच्या प्रतिनिधींकडून उत्तरे मिळत असल्याने योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही उपलब्ध होत आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील गणेश मंडळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कृषी, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, कौशल्य विकास, सहकार आणि सायबर सुरक्षा यासह विविध विभागांच्या योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
२४ सप्टेंबरपर्यंत अभियान
लोकसंवाद २०२६ अभियान २४ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. अधिकाधिक गणेश मंडळांनी या उपक्रमात सहभागी होऊन शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.