प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूरच्या आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद स्थायी सभागृह लातूर येथे नुकतेच आरोग्य तपासणी शिबीर पार पडले त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूर आणि जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी बरुरे, सहाय्यक प्रशासक अधिकारी व्ही जी बादणे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे, जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे आपल्या भाषणात म्हणाले की, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हा पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठीच काम करत असून सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीही नेहमी अग्रेसर असतो. पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम सुरू आहे. आज तर पत्रकार संघाने बी पी, शुगर, ई सी जी व रक्तदान शिबिर घेऊन इतिहास रचला आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी यांनी आतापर्यंत आरोग्य तपासणी शिबीर कोणत्याही पत्रकार संघटनेने घेतले नाही परंतु ही पत्रकार संघटना सामाजिक कार्यात पुढे असल्याचे दिसत आहे त्यामुळे या पत्रकार संघाच्या टीमचे करावे तेवढे कौतुक थोडेच असल्याचे सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप म्हणाले की, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हा सामाजिक कार्य करणारा पत्रकार संघ आहे. ज्येष्ठ पत्रकार तथा दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी दीपरत्न निलंगेकर यांनी पूर्वीची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यात अतिशय साम्य असून पत्रकार हा शासनाचा व सामान्य जनतेचा दुवा असतो त्यामुळे प्रशासनाने व शासनाने पत्रकारांचा सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादन केले. या आरोग्य तपासणी शिबिरात बीपी, शुगर, नेत्र रोग, ईसीजी आदी आजारांची तपासणी करण्यात आली. दरम्यान शकडो कर्मचारी व पत्रकारांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. तसेच काही रक्तदात्यानी रक्तदान केले. सदर आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, मराठवाडा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, जिल्हा संघटक संजय राजूळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव देडे, जिल्हा सचिव दिनेश गिरी आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.