बांगलादेशप्रमाणे भारतात आंदोलनातून सत्ताबदल शक्य नाही रामदास आठवले
मुंबई, दि. २० : भारतात लोकशाही आणि संविधानाची मजबूत व्यवस्था असून आंदोलनाच्या माध्यमातून सरकार उलथवून टाकता येणार नाही. निवडणुकीत बहुमत मिळवूनच सरकार स्थापन करता येते, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
बांद्रा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारतात विविध विषयांवर आंदोलने झाली आहेत. मात्र, भारतीय लोकशाही व्यवस्थेत आंदोलनाला मर्यादा आहेत. त्यामुळे बांगलादेशप्रमाणे आंदोलनातून भारतात सत्ताबदल होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी आणि अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनातून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मतदान यादीतील सुधारणा आवश्यक
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया म्हणजेच एसआयआर आवश्यक असल्याचे आठवले यांनी सांगितले. मतदार यादीत मृत व्यक्तींची नावे, दुबार नोंदी आणि स्थलांतरित मतदारांची नावे असण्याची शक्यता असल्याने यादीत सुधारणा करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
मतदार यादीतील सुधारणा ही योग्य प्रक्रिया असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आमची टीम काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्तांना वाढीव मदत द्या
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असून शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थ अडचणीत आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांचा दुष्काळ दौरा केल्याचे आठवले यांनी सांगितले.
दिवाळीसाठी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांऐवजी किमान २० हजार रुपये आणि शेतमजुरांना १० हजार रुपये मदत दिवाळीपूर्वी देण्यात यावी. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी
राज्यात शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचे आठवले यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांची धनुष्यबाण ही निवडणूक निशाणी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना धनुष्यबाणाऐवजी मशाल हे निवडणूक चिन्ह स्वीकारावे लागल्याची टीका आठवले यांनी केली.