मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहांच्या समस्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहांच्या समस्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहांच्या समस्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

मुंबई, ४ सप्टेंबर २०२६ : मुंबई विद्यापीठाच्या कलिना आणि फोर्ट परिसरातील वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विद्यापीठ प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांनी प्र-कुलगुरू डॉ. अजय भांबरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले.

वसतिगृहांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुरक्षा, आरोग्य सुविधा, जेवणाचा दर्जा तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक वातावरण याबाबत अनेक अडचणी असल्याचा दावा करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात असताना त्यांना मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक असून, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देणे ही विद्यापीठ प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मातेले यांनी सांगितले.

सर्व वसतिगृहांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिकल, अग्निसुरक्षा आणि स्वच्छतेचे स्वतंत्र पथकामार्फत सर्वंकष परीक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. बंद असलेले वॉटर कूलर, प्युरिफायर आणि पंखे तातडीने दुरुस्त करावेत तसेच पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा अहवाल विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सुरक्षा व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच विद्यार्थिनींच्या वसतिगृहांमध्ये महिला सुरक्षा कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. मेसमधील अन्नाची नियमित तपासणी करून गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याची सूचनाही निवेदनातून करण्यात आली आहे.

वसतिगृहांमध्ये स्वतंत्र अभ्यासिका, चांगल्या दर्जाचे इंटरनेट आणि विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प, लिफ्ट आणि आवश्यक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण समिती स्थापन करावी आणि विद्यार्थी प्रतिनिधींसोबत दरमहा आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी पक्षाने केली आहे. तसेच वसतिगृहांच्या सुविधांचे ऑडिट करून त्याचा अहवाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा आणि पुढील ३० दिवसांसाठी स्पष्ट सुधारणा आराखडा जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना केवळ राहण्याची जागा नव्हे तर सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाने मागण्यांवर तातडीने कार्यवाही केली नाही तर विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन व पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा ॲड. अमोल मातेले यांनी दिला.