स्वच्छता ही सेवा अभियानाचा ठाण्यात शुभारंभ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रम
ठाणे, दि. १६ : भारत सरकारच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत स्वच्छता ही सेवा २०२६ अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी स्वयंसेवा आणि सामूहिक कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने २०१७ पासून हे अभियान राबविले जात आहे.
यंदाच्या अभियानाची संकल्पना स्वच्छतेत सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत अशी आहे. नागरिक, संस्था आणि शासन यांच्या सामूहिक सहभागातून स्वच्छ आणि विकसित भारताच्या उभारणीस हातभार लावण्याचा या अभियानाचा उद्देश आहे.
ठाणे महानगरपालिकेतर्फे अभियानाच्या अनुषंगाने विविध स्वच्छता उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १७ सप्टेंबर रोजी महापालिका मुख्यालय, प्रभाग समिती कार्यालये, शाळा, रुग्णालये आणि परिवहन विभागाच्या डेपोमध्ये विशेष स्वच्छता मोहिमा राबविण्यात येणार आहेत.
महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण आणि आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात अभियानाच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे.
नागरिकांनी आपल्या घराची स्वच्छता करून दीप प्रज्वलित करत स्वच्छ जीवनशैलीचा संकल्प व्यक्त करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दीप प्रज्वलनाचे छायाचित्र स्वच्छता ही सेवा अभियानाच्या संकेतस्थळावरील Citizen Corner मधील SHS Rollout Picture Lighting Lamp Diya या पर्यायातून अपलोड करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.