स्वतःला बाळूमामांचा अवतार सांगणाऱ्या भोंदू मनोहर भोसलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
राज्यात भोंदूबाबांची जणू लाटच आली आहे, असं म्हणायची वेळ आली आहे. आता आणखी एका बाबाला अटक करण्यात आली आहे. स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगणाऱ्या मनोहर मामा भोसले या भोंदूबाबाला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या कारवाईबाबत अधिक माहिती दिली. आर्थिक फसवणूक आणि भोंदुगिरीच्या प्रकरणात कुर्डूवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मनोहर मामा भोसले याच्यावर यापूर्वीच ४ गुन्हे दाखल आहेत. करमाळा आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले होते. तसेच, भोंदुगिरी आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात बारामती व दौंड पोलीस ठाण्यांतही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. आता कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक आणि भोंदुगिरी केल्याप्रकरणी नवीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भोंदूबाबा मनोहर भोसले याच्यावर महिलांवरील अत्याचाराव्यतिरिक्त, 'कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करतो' असे खोटे आश्वासन देऊन भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचेही आरोप आहेत. अत्याचार प्रकरणी अटकेत असताना बार्शी सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. सद्यस्थितीत तो जामिनावर असतानाच कुर्डूवाडी पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे.
भोंदूबाबा सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करून फसवणूक करत होता. 'व्यवसाय आणि उद्योगात भरभराट आणण्यासाठी पूजाअर्चा केली पाहिजे' असे सांगून त्याने एका व्यक्तीकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. संबंधित भक्ताने मनोहर मामा आणि त्याच्या साथीदाराला ५० हजार रुपये दिले होते.
मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या व्यक्तीने कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदारावर आर्थिक फसवणूक, जादूटोणा विरोधी कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात कुर्डूवाडी पोलिसांनी तपास चक्रे फिरवत मनोहर भोसलेला पुण्यातुन अटक केली आहे.