बार्शी-लातूर बायपासवर भीषण अपघात

बार्शी-लातूर बायपासवर भीषण अपघात

बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या तत्परतेने अनेकांचे वाचले प्राण

बार्शी : बार्शी-लातूर बायपासवर आज भीषण अपघात झाला. एका भरधाव ट्रकने ऊस तोडी मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने २४ जण जखमी झाले. त्यामध्ये ७ लहान मुले आणि ३ महिला गंभीर जखमी असून, एक लहान बाळ आणि एक मुलगा विशेषतः गंभीर अवस्थेत आहेत. अपघाताची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) दिलीप ढेरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती अत्यंत गंभीर होती, मात्र ढेरे यांनी प्रसंगावधान राखत पोलिसांच्या गाडीला तात्पुरती रुग्णवाहिका (ABULANCE) बनवून जखमींना त्वरीत रुग्णालयात हलवले. यावेळी दिलीप ढेरे यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत आपल्या खिशातूनच अपघातग्रस्तांच्या सुरुवातीच्या उपचाराचा खर्च उचलला. त्यांचा हा संवेदनशील आणि तत्पर निर्णय अनेकांचे प्राण वाचवणारा ठरला. ट्रक (क्रमांक MH 44 U 1057) चालकाने दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ऊस तोडी मजुरांचा ट्रॅक्टर धडकवला. धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्टरचा समोरील भाग पूर्णपणे चिरडला गेला. ट्रॅक्टर चालक श्रीनिवास वैजनाथ दराडे हे या अपघातात अडकून पडले होते. त्यांना मोठ्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी एकत्र येऊन जखमींना मदत केली. पोलीस हवालदार उंदरे, पोलीस शिपाई सरडे, वाघमारे, कौलगे, तसेच , अक्षरा चे सुरवसे आणि इतर ५-६ स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रोहित डोईफोडे रायबा हॉटेलचे मालक देखील मदतीसाठी पुढे आले, मात्र त्यांचे नाव समजू शकले नाही. या अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. या दुर्घटनेचा अधिक तपास सुरू असून, जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात अत्यंत गंभीर असून, नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे.