देवस्थान जमिनींसाठी नवा कुळकायदा; कुळांना व भाडेकरूंना मालकी हक्क देण्याचा प्रस्ताव

देवस्थान जमिनींसाठी नवा कुळकायदा; कुळांना व भाडेकरूंना मालकी हक्क देण्याचा प्रस्ताव

महाराष्ट्र शासनाने नुकतेच महाराष्ट्र देवस्थान ईनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६ जाहीर केले असून, त्यानुसार देवस्थानांच्या मालकीच्या जमिनी व स्थावर मिळकती संबंधित कुळे व भाडेकरूंना मालकी हक्काने त्यांच्या नावावर करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

या प्रस्तावित कायद्यानुसार देवस्थानांच्या ताब्यातील जमिनींवरील संबंधित देवस्थान किंवा मठांचा मालकी हक्क संपुष्टात येणार असून, त्या जमिनींचे मालकी हक्क संबंधित अधिकृत कब्जेदारांना देण्यात येणार आहेत.

मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार रेडीरेकनरमधील मूल्यांकन तक्त्यानुसार देवस्थान मिळकतींचे धारणा मूल्य निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या तर्फे प्राधिकृत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. १ जानेवारी २०११ पूर्वी ज्या अधिकृत कब्जेदार, कुळ किंवा मिरासदारांची नोंद असेल, त्यांना धारणा मूल्य भरल्यानंतर पूर्ण मालकी हक्क देण्यात येणार आहे.

प्रस्तावित कायद्यात अनधिकृत कब्जेदारांसाठीही तरतूद करण्यात आली आहे. अशा व्यक्तीकडून जिल्हाधिकारी संबंधित मिळकत जप्त करतील; मात्र त्यांनी खरेदी मूल्य भरल्यास ती मिळकत त्यांच्या नावावर मालकी हक्काने करण्यात येणार आहे.

ही तरतूद देवस्थानांच्या मालकीच्या शहरातील निवासी किंवा व्यावसायिक इमारतींतील भाडेकरूंनाही लागू होणार आहे. त्यामुळे त्यांच्या ताब्यातील घरे व दुकाने मालकी हक्काने देण्याचा प्रस्ताव आहे.

या अधिनियमांतर्गत उद्भवणाऱ्या कायदेशीर वादांसाठी दिवाणी न्यायालय किंवा इतर सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागता येणार नाही. या बाबतीत अंतिम निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार जिल्हाधिकारी अथवा प्राधिकृत अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.

या प्रारूप अधिनियमाबाबत राज्यातील सर्व देवस्थानांकडून सूचना व हरकती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडे ५ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करता येणार आहेत.

सुमारे ७० वर्षांपूर्वी मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ अंतर्गत १ एप्रिल १९५७ पासून “कसेल त्याची जमीन” या तत्त्वावर शेतजमिनी कुळांना देण्यात आल्या होत्या. त्याच धर्तीवर आता देवस्थान जमिनींबाबतही निर्णय होण्याची शक्यता असून, यावेळी कुळे व भाडेकरूंना पूर्ण मालकी हक्क देण्याचे प्रस्तावित आहे.

— अॅड. शिवराज प्र. कदम जहागिरदार

माजी अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे.