पनवेलमध्ये अतिक्रमणावर कारवाई
पनवेल, दि. ४ : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते आणि फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने अतिक्रमणविरोधी मोहीम तीव्र केली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार गेल्या चार दिवसांत पनवेल शहरासह कळंबोली, खारघर, कामोठे आणि नावडे परिसरात अनधिकृत व्यवसाय, हातगाड्या, फळे व भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
१ ते ४ ऑक्टोबरदरम्यान प्रभाग समिती ड पनवेलच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईत अनधिकृत हातगाड्या आणि फळे भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कळंबोलीतील सेंट जोसेफ शाळेसमोरील फुटपाथवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले स्टॉल हटविण्यात आले. या परिसरात विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी वर्दळ असल्याने फुटपाथ मोकळा करण्यात आला. तसेच रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेली झाडे हटवून नर्सरी चालकांना अंतिम इशारा देण्यात आला.
खारघर परिसरात अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते आणि दुकानांच्या बाहेरील जागेत साहित्य ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. दुकानाची हद्द ओलांडून सार्वजनिक जागेत ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले.
कामोठे प्रभागात ३ ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम राबवून अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईत २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नावडे उपविभागात अनधिकृत हातगाड्या तसेच फळे व भाजी विक्रेत्यांवर कारवाई करून १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पनवेल, कामोठे आणि नावडे उपविभागांतील कारवाईत आतापर्यंत एकूण २ लाख ४७ हजार रुपयांचा दंड पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
मुख्य रस्ते, शाळा परिसर आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सार्वजनिक जागांवर अनधिकृतपणे साहित्य ठेवून वाहतूक तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे यांनी केले आहे.