राज्यस्तरीय युवा महोत्सव २०२५-२६ जल्लोषात सुरू
पुणे, दि. ३० (जिमाका वृत्तसेवा) : युवा महोत्सव म्हणजे केवळ स्पर्धांचे आयोजन नव्हे, तर युवक-युवतींना विविध क्षेत्रांत आपले नेतृत्वगुण सिद्ध करण्याचे सशक्त व्यासपीठ आहे. युवकांचा सर्वांगिण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे, युवकांमधील सुप्त गुणांना वाव देणे तसेच राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त श्रीमती शितल तेली उगले यांनी केले.
राज्यस्तरीय युवा महोत्सव २०२५-२६ चे आयोजन दि. २९ डिसेंबर २०२५ ते दि. १ जानेवारी २०२६ या कालावधीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, निगडी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात करण्यात आले असून आयुक्त श्रीमती शितल तेली उगले यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. सतिश राउत, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहायक संचालक श्री. मिलिंद दिक्षित, सहायक संचालक श्री. चंद्रशेखर साखरे, सहाय्यक संचालक कु. अर्णव महर्षी, राष्ट्रीय बाल पुरस्कारार्थी श्री. गोपाल देवांग, अर्जुन पुरस्कारार्थी (बॉक्सिंग) श्री. हितेंद्र सोमाणी, प्रथम राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी (१९९५) तसेच राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी श्री. ताहेर आसी आदी मान्यवर उपस्थित होते.
आयुक्त श्रीमती शितल तेली उगले यांनी युवक-युवतींनी एआय तंत्रज्ञानाचा सकारात्मक व सर्जनशील वापर करून आपल्या कला व करिअरमध्ये यश संपादन करावे, असे आवाहन केले. एआयसारखे आधुनिक तंत्रज्ञान युवकांसाठी समान संधी घेऊन आले असून, त्याचा नावीन्यपूर्ण वापर करून स्वतःचे कौशल्य व प्रभुत्व सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे. आजची पिढी ऊर्जावान असून त्यांच्या क्षमतांचा उपयोग नवोपक्रम, कलागुणांच्या विकासासाठी व्हावा. येथून जाताना केवळ फोटो आणि प्रमाणपत्र नव्हे, तर उज्ज्वल भविष्य घडविणारी सकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन जा, असेही त्यांनी नमूद केले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. सतिश राउत यांनी आपल्या भाषणात युवकांना प्रेरणा देणारी विविध उदाहरणे मांडत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या चिकाटी व सातत्याचा कानमंत्र दिला. तसेच ज्यांच्याकडे लेखनाची उर्मी आहे, अशा भावी लेखक व कवींनी दर्जेदार साहित्यनिर्मिती करून मराठी साहित्य अधिक समृद्ध करावे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
प्रास्ताविकात पुणे क्रीडा व युवक कल्याण विभागाचे उपसंचालक श्री. युवराज नाईक यांनी महोत्सवाची पार्श्वभूमी विशद करत सहभागी युवक-युवतींसाठी निवास, भोजन, किट आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली.
या राज्यस्तर युवा महोत्सवात पुणे, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नाशिक व मुंबई या आठ विभागांतून १५ ते २९ वयोगटातील एकूण ३१२ युवक-युवती सहभागी झाले आहेत. लोकगीत, लोकनृत्य, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व व काव्यलेखन अशा विविध कला प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले आहे. या स्पर्धांतील विजयी संघ दि. १० ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ‘जय मल्हार’ फेम अभिनेत्री श्रीमती ईशा केसकर तसेच ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील अभिनेता श्री. अक्षय टांगसाळे यांनी उपस्थिती लावली. पोवाडा व लावणी नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जगन्नाथ लकडे यांनी केले.