अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३१.७३ लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त, १४ जणांवर गुन्हे

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३१.७३ लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त, १४ जणांवर गुन्हे

पुणे, दि. ४ : अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने १ व २ जून २०२६ रोजी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत धडक कारवाई करत भेसळीच्या संशयावरून ३१ लाख ७३ हजार रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. तसेच ५ लाख ४५ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा जप्त करून १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून अटकेची कारवाईही करण्यात आली आहे.

सह आयुक्त (अन्न) दि. वा. भोगावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील धन्वंतरी डिस्ट्रीब्यूटर्स येथे २१.४० लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला, तर पुण्यातील विविध डेअरी व व्यापारी आस्थापनांमधून खाद्यतेल, तूप, पनीर आणि इतर अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यात तेल उत्पादक आणि व्यापारी आस्थापनांवर छापे टाकून लाखो रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त करण्यात आला. तसेच विविध ठिकाणी लेबलदोष, मिथ्याछाप आणि भेसळीच्या संशयावरून कारवाई करण्यात आली.

प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील १४ आस्थापनांवर धाडी टाकून गुटखा, सुगंधित सुपारी आणि इतर बंदी असलेला अन्नसाठा जप्त करण्यात आला. संबंधितांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्री करणाऱ्यांविरोधात अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले असून नागरिकांनी संशयास्पद बाबींची माहिती टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर देण्याचे आवाहन केले आहे.