अमित शाह यांची भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयाला भेट 42 वर्षांच्या सामाजिक कार्याचा घेतला आढावा
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुण्यातील भारतीय जैन संघटना आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशनच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या 42 वर्षांच्या प्रवासाची, सामाजिक योगदानाची आणि विविध उपक्रमांची माहिती घेतली. संस्थेच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था उपस्थित होते.
यावेळी शांतिलाल मुथ्था यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती सादर केली. जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, मूल्यवर्धन कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन, आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन आणि सामाजिक विकास या क्षेत्रांत संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला.
भारतीय जैन संघटना आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांनी गेल्या 42 वर्षांत विविध सामाजिक क्षेत्रांत केलेल्या कार्याची माहिती जाणून घेत अमित शाह यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला भारतीय जैन संघटनेचे विश्वस्त वल्लभ भन्साळी, अभय फिरोदिया, व्यवस्थापकीय संचालक कोमल जैन आणि राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांकला यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक कार्यालयाची पाहणी
भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयाला भेट देण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्य मान्यवरांनी नव्याने स्थापन झालेल्या सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यालयाची पाहणी केली.