अवयवदान जनजागृतीला कुरकुंभमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, दि. ३ : सेवा संकल्प अभियानांतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, पुणे यांच्या अंतर्गत सेवा दवाखाना, कुरकुंभ येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. अवयवदानाचे महत्त्व आणि त्यातून गरजू रुग्णांना मिळणाऱ्या जीवनदानाबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांनी अवयवदान हे केवळ दान नसून गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची अमूल्य संधी असल्याचे सांगितले. समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
औषध निर्माता अजिंक्य देसाई यांनी अवयवदानाचे महत्त्व, प्रक्रिया आणि त्यातून मिळणारे जीवनदान याबाबत मार्गदर्शन केले. अवयवदानासंदर्भातील गैरसमज दूर करून अधिकाधिक नागरिकांनी या मानवतावादी उपक्रमात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवयवदानाची प्रक्रिया, महत्त्व आणि फायदे याविषयी माहिती देणारी पोस्टर्स तयार करून प्रदर्शन भरविले. या माध्यमातून उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि विमाधारकांना अवयवदानाबाबत माहिती देण्यात आली.
वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. रंगदळ, डॉ. तनुजा गवार्ले, डॉ. शुभम मोहोळकर आणि सेवा दवाखाना कुरकुंभचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.