वडाळे तलावात आणखी ५० हजार जैविक कीटक सोडले

वडाळे तलावात आणखी ५० हजार जैविक कीटक सोडले
वडाळे तलावात आणखी ५० हजार जैविक कीटक सोडले

पनवेल, दि. १५ : ऐतिहासिक वडाळे तलावातील जलपर्णीच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी पनवेल महानगरपालिका आणि ICAR खरपतवार संशोधन संचालनालय, जबलपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जैविक नियंत्रण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या टप्प्यात सायर्टोबॅगस साल्विनी या जैविक नियंत्रण करणाऱ्या कीटकांचे आणखी ५० हजार कीटक तलावात सोडण्यात आले.

महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यापूर्वी ७ मे २०२६ रोजी तलावात २० हजार कीटक सोडण्यात आले होते. तलावातील अनुकूल वातावरणामुळे या कीटकांचे नैसर्गिक प्रजनन प्रभावीपणे झाल्याचे दिसून आले आहे.

सायर्टोबॅगस साल्विनी हे कीटक प्रामुख्याने सॅल्विनिया मोलेस्टा या जलपर्णीवर उपजीविका करतात. त्यामुळे तलावातील इतर वनस्पती आणि जलपरिसंस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. या जैविक पद्धतीमुळे जलपर्णी नियंत्रणाच्या प्रक्रियेला वेग मिळण्याची अपेक्षा आहे.

जलपर्णीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तलावातील पाण्याचे अभिसरण सुधारण्यास मदत होणार असून, जलपरिसंस्थेतील नैसर्गिक संतुलन पुनर्स्थापित होण्यास हातभार लागणार आहे. तसेच स्थलांतरित पक्षी आणि जलचरांसाठी अनुकूल अधिवास निर्माण होण्याची शक्यता आहे. तलावाचे नैसर्गिक सौंदर्यही खुलणार असल्याची माहिती उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली.

जलपर्णी निर्मूलनाच्या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यातील कीटकांमुळे जलपर्णी पिवळसर आणि गर्द चॉकलेटी होण्याची प्रक्रिया अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील नऊ महिन्यांत जलपर्णी नष्ट होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे वडाळे तलावाच्या संवर्धनाला चालना मिळणार आहे.