टेंभी नाका नवरात्रोत्सवाचे ४८ व्या वर्षात पदार्पण
ठाणे, ता. ११ : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, यासाठी टेंभी नाक्यावरील आई दुर्गेश्वरीच्या चरणी साकडे घालण्यात आले. दुष्काळाच्या संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून केंद्र सरकारकडूनही भरीव मदत मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच नवरात्रोत्सव मंडळांनी उत्सवातील काही बचत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन त्यांनी केले.
टेंभी नाका येथील श्री जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या आई दुर्गेश्वरीचा आगमन सोहळा घटस्थापनेच्या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल ताशे, लेझीम, टाळ मृदंग, कोळी नृत्य, गोंधळ नृत्य आणि आदिवासी तारपा नृत्य अशा विविध पारंपरिक कलाप्रकारांनी सजलेली भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंडपात देवीचे विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येऊन गेले आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आढावा बैठकही पार पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असता महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना आवश्यक सवलती, नुकसानभरपाई आणि संकटग्रस्त कुटुंबांना मदत दिली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबांवर आलेल्या संकटाचा उल्लेख करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहाचा प्रश्नही महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून शिवसेनेने ही जबाबदारी स्वीकारली आहे. मराठवाड्यातील २५ हजार शेतकरी कुटुंबांतील मुलींना सायकली आणि २५ हजार महिलांना शिलाई मशीन वाटपाचा शुभारंभ परभणीतून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मंडळाने यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवातील बचतीतून शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाणार आहे. इतर नवरात्रोत्सव मंडळांनीही खर्चात बचत करून बळीराजाला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले. बळीराजाची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या टेंभी नाका नवरात्रोत्सवाचे यंदा ४८ वे वर्ष आहे. यंदा देवभूमी उत्तराखंडमधील श्री बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी देवी, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
देवीच्या आगमन सोहळ्यावेळी ठाणे पोलिसांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मानवंदना देण्यात आली. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
या सोहळ्याला खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, महापौर शर्मिला पिंपळोलकर, गटनेते पवन कदम, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर कोकाटे, शिवसेना राज्य संघटनाप्रमुख आनंद परांजपे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह कमलेश चव्हाण, निखिल बुडजडे, जॅकी भोईर, स्वानंद पवार, किरण नाकती, बाळा गवस, अमित जयस्वाल आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.