ठाणे, ता. 1 :
धर्माच्या विविध वाटा अखेरीस मानवतेच्या आणि शांततेच्या एकाच ध्येयाकडे नेतात, हा संदेश देत ठाणे महावीर जैन ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य व दिव्य त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने संपूर्ण शहरात धार्मिक एकतेचा, सौहार्दाचा आणि आध्यात्मिक जागृतीचा नवा अध्याय सुरू केला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
1 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी मंदिरात दर्शन घेत भाविकांशी संवाद साधला आणि या पवित्र कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
मंत्रोच्चार, विधी-विधान आणि भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडला. या वेळी जैन समाजातील सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, देश-विदेशातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, अशी धार्मिक स्थळे समाजात शांतता, एकोपा, नैतिक मूल्ये आणि सामाजिक सलोखा जपण्याचे महत्त्वाचे कार्य करतात.
“हे केवळ मंदिर नाही, तर संपूर्ण विश्वासाठी आध्यात्मिक एकतेचे प्रतीक आहे. विविध धर्म, पंथ आणि विचारधारांचे प्रतिनिधित्व करणारे हे त्रिमंदिर मानवतेला सुख देण्याचा, दुःख न देण्याचा आणि अहिंसा, सत्य, आत्मशुद्धी व मोक्षप्राप्ती या समान मूल्यांवर आधारित मार्ग दाखवते, असे शिंदे म्हणाले.
त्रिमंदिरात एकाच छताखाली तीन प्रमुख विचारधारांचे दर्शन घडते. येथे सीमंधर स्वामीजींची प्रतिमा, योगेश्वर श्रीकृष्ण भगवान आणि भव्य शिवलिंग विराजमान असून, या तीनही मूर्ती मनाला शांती आणि आनंद देणाऱ्या आहेत. या अनोख्या संकल्पनेमुळे कोणताही भाविक येथे आला, तरी “हे माझेच मंदिर आहे,” अशी भावना त्याच्या मनात निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले.
ठाण्याची भूमी या मंदिरामुळे अधिक पवित्र झाली असून, शहराची ओळख आता केवळ औद्योगिक किंवा सांस्कृतिक शहर म्हणून नव्हे, तर धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणूनही दृढ होत आहे. “आजचा हा सोहळा केवळ ठाण्यासाठी नाही, तर महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे,” असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
दादा भगवान यांच्या प्रेरणेतून आणि दादा भगवान फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या त्रिमंदिराचा उद्देश विज्ञानाच्या माध्यमातून शांती, एकता आणि शाश्वत आनंदाचा प्रसार करणे हा आहे. लाखो लोक या विचारधारेतून प्रेरित झाले असून, “स्वतःचा शोध घेतल्याशिवाय मानव जीवनाचा खरा उद्देश समजत नाही,” हा संदेश या मंदिरातून दिला जातो.
मान्यवरांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा उल्लेख करत सांगितले की, “विवाद नाही, संवाद; विरोध नाही, समन्वय; विनाश नाही, सहायता यातूनच शांतीचा खरा मार्ग सापडतो.” विविध नद्या वेगवेगळ्या स्रोतांमधून वाहत जाऊन जसे समुद्रात मिळतात, तसेच विविध धर्ममार्ग मानवाला ईश्वराकडे नेतात, हा भाव या मंदिरातून प्रकट होत असल्याचे शिंदे यांनी अधोरेखित केले.
या प्रकल्पासाठी दीपकभाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले. मंदिराच्या भूमिपूजनापासून ते भव्य दिव्य रूप घेईपर्यंत अनेक सेवाभावी लोकांचे योगदान लाभले, असेही सांगितले. महाराष्ट्रातील बोरिवली, पुणे आणि ठाणे येथे तसेच गुजरातमध्येही अशा स्वरूपाची धार्मिक व आध्यात्मिक केंद्रे उभारण्याचे कार्य सुरू आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी परिसराच्या विकासाबाबत आश्वासन देत सांगितले की, भाविकांना कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि सोयी-सुविधा पुरविण्यास शासन कटिबद्ध राहील. कॅन्सर हॉस्पिटलसारख्या सेवाभावी उपक्रमांनाही लवकरच गती देण्यात येत असल्याने शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.
ठाणे शहराला भविष्यात जागतिक स्तरावरील आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळख मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. “मानवता कल्याण हेच सर्व धर्मांचे अंतिम लक्ष्य आहे. हा मार्ग सामूहिकरीत्या शोधला, तर समाजात खरी शांती आणि सुख नांदेल,” असे मत शिंदे यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या शेवटी, या भव्य दिव्य मंदिराच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्व सेवक, स्वयंसेवक, भाविक आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले. “ठाण्यातून विश्वशांतीचा, धार्मिक एकतेचा आणि मानवतेचा संदेश दूरवर पोहोचला.
[5:58 PM, 2/1/2026] Rupali Ks: __