डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच संविधानाचे खरे शिल्पकार रामदास आठवले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच संविधानाचे खरे शिल्पकार रामदास आठवले

भुवनेश्वर : भारतीय संविधानाचे खरे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर असून संविधान निर्मितीमध्ये त्यांचे योगदान सर्वाधिक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

ओरिसातील अंगुल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी संविधानाची निर्मिती केली. संविधान बदलण्याचा प्रयत्न करणारे स्वतःच उध्वस्त होतील, असा इशाराही त्यांनी दिला.

या कार्यक्रमाला भाजपचे आमदार प्रतापचंद्र प्रधान, अगस्ती मेहरा, रिपब्लिकन पक्षाचे ओरिसा प्रदेशाध्यक्ष अब्दुल वाली, विजय गुप्ता आणि डॉ. आंबेडकर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रफुल्ला नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण रामदास आठवले यांच्या हस्ते व्हावे, अशी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. त्यानुसार आठवले यांची वेळ घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रफुल्ला नाईक यांनी दिली.

यावेळी आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे समर्थन करत विरोधी पक्षांवर टीका केली. मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे दलित समाजातील रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची संधी मिळाली. त्यानंतर आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी समाजातील नेत्यांनाही मंत्रिमंडळात संधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व असल्याचे सांगत राहुल गांधी हे मोदी सरकार आणि देशातील संविधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही रामदास आठवले यांनी केला.