दशावतारातून मानवी उत्क्रांतीचा प्रवास समजून घेणे काळाची गरज राजेंद्र पाटणकर
ठाणे : भारतीय संस्कृतीतील दशावतार आणि मानवी उत्क्रांती यांचा परस्परसंबंध उलगडून सांगताना ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र पाटणकर यांनी दशावताराकडे केवळ धार्मिक किंवा पौराणिक दृष्टिकोनातून न पाहता त्यामागील जीवनमूल्ये, मानवी स्वभाव आणि उत्क्रांतीचा प्रवास समजून घेण्याची गरज व्यक्त केली.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस आणि मराठी भाषा सप्ताहानिमित्त महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात दशावतार आणि उत्क्रांती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ निवेदक आणि विचारप्रवर्तक राजेंद्र पाटणकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
दशावतारातील क्रम हा जलचरांपासून अधिक जटिल जीवसृष्टीकडे आणि मानवाकडे होणाऱ्या उत्क्रांतीचे प्रतीक म्हणून मांडला जातो, असे पाटणकर यांनी स्पष्ट केले. उत्क्रांतीची संकल्पना समजावून सांगताना मानवी शरीरातील पेशींमध्ये होणारे बदल, जन्मापासून वृद्धत्वापर्यंत शरीरात घडणारे परिवर्तन आणि निसर्गाशी असलेले मानवी शरीराचे नाते त्यांनी सोप्या उदाहरणांतून स्पष्ट केले. परिस्थिती आणि गरजेनुसार जीवसृष्टीत बदल घडत असतात आणि उत्क्रांती ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दशावतारातील विविध अवतारांचे महत्त्व सांगताना त्यांनी मत्स्य अवतारातून संरक्षण, कूर्म अवतारातून आधार, वराह अवतारातून संकटांवर मात करण्याची क्षमता आणि नरसिंह अवतारातून प्रतिकूल परिस्थितीत मार्ग शोधण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. वामन अवतार नम्रतेचे, परशुराम शिस्तीचे, प्रभू राम कर्तव्य आणि आदर्श जीवनाचे, तर भगवान श्रीकृष्ण बुद्धी, युक्ती आणि योग्य निर्णयक्षमतेचे महत्त्व अधोरेखित करतात. बुद्ध अवतारातून शांतता आणि साधनेचा संदेश मिळतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
दशावतारातील कथा केवळ पौराणिक घटना म्हणून न पाहता त्यातील जीवनमूल्ये आजच्या जीवनाशी जोडून समजून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन पाटणकर यांनी केले. या व्याख्यानादरम्यान उपस्थितांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आल्याने कार्यक्रमाला संवादात्मक स्वरूप प्राप्त झाले. दशावतार, मानवी जीवन आणि उत्क्रांती यांचा नव्या दृष्टिकोनातून घेतलेला हा वेध उपस्थितांसाठी ज्ञानवर्धक आणि विचारप्रवर्तक ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रभारी उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांनी राजेंद्र पाटणकर यांचे आभार मानले