पनवेल महानगरपालिकेतर्फे महिलांसाठी भव्य श्रावण महोत्सव २०२६

पनवेल महानगरपालिकेतर्फे महिलांसाठी भव्य श्रावण महोत्सव २०२६

पनवेल, दि. १४ ऑगस्ट : पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांसाठी भव्य ‘श्रावण महोत्सव २०२६’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महिलांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

श्रावण महिन्यातील पारंपरिक सण-उत्सव, संस्कृती आणि कलांना मनोरंजनाची जोड देत महिलांच्या उत्साहाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. ‘महिलांसाठी एक दिवस आनंदाचा, उत्साहाचा आणि सक्षमीकरणाचा!’ ही या महोत्सवाची संकल्पना आहे.

महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध अभिनेता दिगंबर नाईक, अभिनेत्री सायली पराडकर आणि लावणी सम्राट आश्मिक कामठे यांची विशेष उपस्थिती व सादरीकरण होणार आहे. यासोबत पारंपरिक मंगळागौर, लावणी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, महिलांसाठी आकर्षक लकी ड्रॉ आणि विविध बक्षिसांची मेजवानीही असणार आहे.

कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि विधानपरिषद सदस्य आमदार विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन जयराम पाटील राहणार आहेत. तसेच महानगरपालिकेतील विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे यांच्या विशेष पुढाकारातून या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.

याबाबत बोलताना ममता प्रितम म्हात्रे म्हणाल्या, “श्रावण महोत्सवाच्या माध्यमातून महिला भगिनींना मनोरंजन, पारंपरिक संस्कृती, कला आणि आनंदाने भरलेला एक हक्काचा दिवस अनुभवता यावा, हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच महिलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध विषयांची उपयुक्त माहितीही सहज-सोप्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या महोत्सवातून करण्यात येणार आहे.”

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महिला भगिनींनी या आनंदोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.