पनवेल महानगरपालिकेत लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

पनवेल महानगरपालिकेत लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारींचे निवारण
पनवेल महानगरपालिकेत लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

पनवेल, दि. ७ : नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयातील बैठक कक्षात आज लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने, सहाय्यक आयुक्त बाळाराम रातांबे, शहर अभियंता राजेश कर्डिले, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख कीर्ती महाजन यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

लोकशाही दिनामध्ये विविध विभागांशी संबंधित दोन अर्ज प्राप्त झाले. प्राप्त अर्जांची तातडीने दखल घेत संबंधित नागरिकांच्या समस्या सोडविण्याची कार्यवाही करण्यात आली.

महानगरपालिकेत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. नागरिकांनी आपल्या वैयक्तिक तक्रारींचे अर्ज समन्वय अधिकाऱ्यांकडे लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी सादर करावेत. तसेच संबंधित नागरिकांनी लोकशाही दिनाच्या दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.