पुणे जिल्ह्यात दिवाळी फराळ विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

पुणे जिल्ह्यात दिवाळी फराळ विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद!
पुणे जिल्ह्यात दिवाळी फराळ विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

पुणे : ग्रामीण महिलांच्या कष्टाला बाजारपेठ मिळवून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत पुणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या दिवाळी फराळ विक्री उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात जिल्ह्यातील ५०० हून अधिक महिला बचत गटांनी सहभाग घेतला असून, जिल्ह्यातील विविध ८७ ठिकाणी विक्री स्टॉल उभारण्यात आले. या माध्यमातून ५० लाख रुपयांपेक्षा अधिक विक्रीची उलाढाल झाली आहे.

महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

पुणे जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांसह पुणे जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध कंपन्या, कॉर्पोरेट कार्यालये, मॉल्स आणि मोठ्या बाजारपेठांमध्ये हे स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये महिलांनी स्वतः तयार केलेले चकली, लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळे, अनारसे यांसारखे पारंपरिक दिवाळी फराळाचे पदार्थ, मसाले, विविध खाद्यपदार्थ, हस्तकला साहित्य, सजावटीच्या वस्तू, भेटवस्तू आणि गृहउपयोगी उत्पादने विक्रीसाठी ठेवली होती.

ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार आणि चविष्ट उत्पादनांना शहरी ग्राहकांनी पसंती दिली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यामुळे महिला बचत गटांना चांगले उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे, कंपन्या आणि कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये स्टॉल उभारल्यामुळे बचत गटांना नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची आणि व्यवसायवृद्धीची संधी मिळाली.

या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना शहरी बाजारपेठेत ओळख मिळाली असून, ग्रामीण आणि शहरी बाजारपेठेतील दुवा अधिक मजबूत झाला आहे. महिलांना केवळ उत्पादन निर्मितीपुरते मर्यादित न ठेवता विक्री, विपणन आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातही संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.

या उपक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष मा. श्री. विवेक वळसे पाटील, विविध विषय समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक मा. श्री. संतोष हराळे तसेच जिल्हा परिषद सदस्य यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील अधिकारी-कर्मचारी, प्रभागसंघ, ग्रामसंघ, महिला बचत गट आणि संबंधित यंत्रणांनी विशेष परिश्रम घेतले.

महिलांच्या कष्टाला बाजारपेठ, उत्पादनाला ग्राहक आणि उद्योजकतेला नवी दिशा देणारा उमेद अभियानाचा हा दिवाळी उपक्रम महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरला आहे.